Corona मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत केंद्राकडून कशी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:23 PM2021-09-28T17:23:21+5:302021-09-28T17:31:28+5:30
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन मात्र आता चौकशीसाठी खणखणू लागले आहेत.
पुणे : कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत केंद्र शासनाने जाहीर केली आहे. मात्र, केंद्र शासनाकडून अद्याप याबाबतची मदत राज्य सरकारकडे आलेली नाही. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन मात्र आता चौकशीसाठी खणखणू लागले आहेत.
केंद्र सरकारने घोषणा केली आहे. मात्र, राज्य सरकारकडून ती जिल्ह्याला अद्याप प्राप्त झाली नाही. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भाग असे मिळून पुणे जिल्ह्यात एकूण १८ हजार ७८२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. केंद्र शासनाच्या कायद्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत ५० हजारांची मदत कशी मिळणार भाऊ, अशी माहिती विचारणारे फोन आता खणखणू लागले आहेत. केंद्र सरकारने मदत देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, निधी अद्याप वितरित केला नसल्याने पुणे जिल्हा आपत्ती प्रशासनासमोर प्रश्न उभे राहिले आहेत.
सरकारकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर
कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत केंद्र शासनाने जाहीर केली आहे. आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ही मदत करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप हा निधी राज्य शासनाला प्रा्प्त झाला नाही. त्यामुळे राज्यातील ३६ जिल्ह्यांना तो वितरित झाला नाही. याबाबतचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केले असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मदतीसाठी हे आहेत निकष? कोठे करायचा संपर्क?
केंद्र सरकारने मदतीची केवळ घोषणा केली आहे. त्यासंदर्भात अधिकृतपणे अध्यादेश अजून काढलेला नाही. त्यामुळे मदतीसाठीचे निकष काय आहेत. संपर्क कोठे करायचा, याबाबत काहीच सूचना नसल्याने त्या नागरिकांना सांगता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. निधी कसा देण्यात येणार आहे. याबाबतही शासन स्तरावरून लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे.
- पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित : ११ लाख ३५ हजार ६३४
- पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त : ११ लाख १० हजार १११
- जिल्ह्यातील कोरोना बळी : १८,७८२
- पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण : ६ हजार ७४१