१५ जूनला कशी वाजणार राज्यातील शाळांची घंटा?; मुलांना शाळेत पाठविण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 04:41 AM2020-05-27T04:41:42+5:302020-05-27T06:35:42+5:30
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.
पुणे : लॉकडाउन उठविण्याबाबतची अनिश्चितता कायम असताना शैक्षणिक वर्ष १५ जूनलाच सुरू होईल, असे राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात शाळा सुरू होतील का, याबाबतची अनिश्चितता कायम आहे.
कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव, क्वारंटाईनसाठी शाळांचा केलेला उपयोग, या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अरोग्याची हमी घ्यायला संस्थाचालक तयार नाहीत. त्यामुळे पालकांच्या मनात धास्ती कायम असून ते पाल्यांना शाळेत धाडण्यास राजी नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील शाळा सुरू करायच्या अथवा नाही, याविषयीचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडूनच घेतला जाणार आहे. राज्यात बहुतेक सर्व जिल्ह्यांत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
मुंबई व नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यांत आॅनलाइन वर्ग सुरू ठेवावेत, अशी पालकांची अपेक्षा आहे. नागपूरमधील पालकांचाही विरोध असून कोरोनावरील लस शाळा कोणत्या पद्धतीने सुरू कराव्यात याबाबत शिक्षण विभागाकडून अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.
शाळा नव्हे, शैक्षणिक वर्ष सुरू होणार !
१५ जूनपासून शाळा नव्हे तर शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबत पालिका आयुक्त व जिल्ह्यातील इतर शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जातील, असेही शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.