घरंच नाही तर मुलीच्या सासरकडच्यांना लग्नाची तारीख ठरवायला बाेलवू कसं ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 07:40 PM2018-10-27T19:40:33+5:302018-10-27T19:43:50+5:30
मुठा कालवा दुर्घटनेत दांडेकर वसाहतीत राहणाऱ्या अरुणा लाेंढे यांचे घर देखील वाहून गेले. सरकारने लवकरात लवकर घर बांधून द्यावे अशी त्यांची मागणी अाहे.
राहुल गायकवाड
पुणे : एक महिन्यापूर्वी पुण्यातला मुठा कालवा फुटल्याने शेकडाे कुटुंब बेघर झाली. अाॅफिसमध्ये नुकताच पाेहचलेल्या स्वप्नाला तिचं घर पाण्यात बुडाल्याचा फाेन अाला. घरी जाऊन पाहते तर हाेत्याचा नव्हतं झालं हाेतं. स्वप्नाचं काहीच दिवसांपूर्वी लग्न ठरलं हाेतं. पाण्याच्या जाेरामुळे घराच्या मागची भिंत पडून घरातील सर्व सामान मागील अाेढ्यात वाहून गेलं हाेतं. अाजही स्वप्नाच्या अाई अरुणा लाेंढे अापल्या तुटलेल्या घराकडे एकटक बघत बसतात. ज्या घरातून मुलीला सासरी पाठवायची स्वप्न पाहीली हाेती तेच घर राहिलं नसल्याने मुलीच्या सासरकडच्यांना लग्नाची तारीख ठरवायला बाेलवायचं कसं असा प्रश्न त्यांना पडला अाहे.
27 सप्टेंबर राेजी सकाळी 10.30 च्या सुमारास पुण्याच्या मध्यभागातून जाणारा मुठा कालवा फुटला. क्षणार्धात लाखाे लिटर पाणी दांडेकर वसाहतीत शिरले. या प्रलयात अनेकांची घरे वाहून गेली. गेल्या महिन्याभरानंतरही येथील बहुतांश कुटुुंबे मदतीच्या प्रतिक्षेत अाहेत. या दुर्घटनेत स्वप्ना लाेंढे या तरुणीचे घर वाहून गेले. पाण्याच्या दबावामुळे घराची भिंत तुटल्याने घरातील सर्व सामान मागील अाेढ्यात वाहून गेले. एैन महिन्याभरावर लग्न अालेले असताना हा प्रसंग घडल्याने स्वप्ना व तिच्या अाईवर दुःखाचा डाेंगर काेसळला. दाेघी माई-लेकीच घरात राहत हाेत्या. स्वप्ना एका साेन्याच्या दुकानात अकाऊंटंटचे काम करते. तर अाई धुनीभांडी करुन घराला हातभार लावते. मुलीच्या लग्नासाठी पै पै साठवलेली डाेळ्यासमाेर वाहून जाताना पाहून अाईच्या डाेळ्यात अश्रू दाटले. अाज एक महिन्यानंतरही स्वप्ना अाणि तिच्या अाईला कुठलिही मदत मिळाली नाही. स्वप्ना अाणि अरुणा या त्यांच्या माेठ्या मुलीकडे रात्री राहण्यास जातात. परंतु जावयाच्या घरी तरी किती दिवस राहायचं असा प्रश्न त्यांना सतावताेय. त्यात मुलीचं लग्नाची तारीख ठरवण्यासाठी तिच्या सासरकडच्यांना या पडक्या घरात कसं बाेलवायचं या विवंचनेत त्या घरासमाेर बसून असतात.
अरुणा लाेंढे म्हणाल्या, एक महिन्यानंतरही अाम्हाला सरकारकडून कुठलिच मदत मिळाली नाही. मुलीचं लग्न ठरलंय परंतु लग्नाची तारीख ठरविण्यासाठी तिच्या घरच्यांना लग्नाची तारीख ठरविण्यासाठी कुठल्या घरात बाेलवणार. सध्या अाम्ही माझ्या माेठ्या मुलीकडे राहत अाहाेत. पण तिच्याकडे जास्त दिवस राहता येणार नाही. अाम्हाला लवकरात लवकर सरकाराने घर बांधून द्यावे हीच अामची मागणी अाहे.