HSC Exam : बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्रावर सकाळी साडेनऊलाच हजर व्हावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 10:13 AM2022-02-25T10:13:02+5:302022-02-25T10:19:27+5:30
सकाळी साडेनऊ वाजता विद्यार्थ्यांना यावं लागणार केंद्रावर...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षांसाठी (HSC Exam 2022) विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी साडेनऊ वाजता थर्मल स्कॅनिंगसाठी (thermal scanning) हजर राहावे लागणार आहे. परिणामी नाष्टा करून विद्यार्थ्यांना घराबाहेर सकाळी लवकर पडावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आले आहे.
भाषा विषयाच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना सकाळी ९.३० ते दुपारी २ या कालावधीत वर्गात उपस्थित रहावे लागणार आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागरण करतात. तसेच जेवनाच्या वेळा बदलतात. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आहारात बदल होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत पुरेशी विश्रांती घ्यावी. अभ्यासाचा ताण घेऊन जागरण करू नये. तसेच नेहमीच्या सवईचा आहार घ्यावा, आहारात बदल झाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे नाष्टा करूनच विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडावे. भाषा विषयाच्या पेपरसाठी मोठा कालावधी देण्यात आला आहे. उर्वरित विषयाचा पेपर भाषा विषयाच्या पेपर पेक्षा सव्वातास आधी सुटणार आहे.
परीक्षा कालावधीत पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा त्यांच्याच शैक्षणिक संस्थेत देण्याची संधी दिली आहे. कोरोनामुळे थर्मल स्कॅनिंग केले जाणार असेल तर विद्यार्थ्यांनी व पालकांनी याबाबत सहकार्य करणे गरजेचे आहे.
- दिलीप विश्वकर्मा, पालक, महापॅरेंट्स असोसिएशन