कटकेवाडी फाटा परिसरातील सिस्का कंपनीच्या गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:11 AM2021-03-25T04:11:44+5:302021-03-25T04:11:44+5:30
वाघोली : पुणे-नगर महामार्गावरील कटकेवाडी फाटा परिसरामध्ये असलेल्या सिस्का कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. २३) सायंकाळी ...
वाघोली : पुणे-नगर महामार्गावरील कटकेवाडी फाटा परिसरामध्ये असलेल्या सिस्का कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. २३) सायंकाळी उशिरा उघडकीस आली. रात्रभर जळत असलेल्या या गोदामातील लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, एलईडी जळून खाक झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी पीएमआरडीए अग्निशमन दलाने महापालिका, एमआयडीसी दलाच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले.
कटकेवाडी परिसरामध्ये लोणी कंद हद्दीत असलेल्या सिस्का कंपनीच्या गोदामाला आग लागल्याची माहिती सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाला समजली. तत्काळ आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या. गोदामामध्ये असलेले स्क्रॅप मटेरियल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे आगीने भयंकर रूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पीएमआरडीएच्या ४ गाड्या, महापालिकेच्या २, एमआयडीसीची १ व अॅमेनोराची १ अशा आठ गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग विझविण्यासाठी पाणी कमी पडू लागल्याने खाजगी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात आला. रात्रभर गोदामामध्ये आगीचे तांडव व आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु होते. वाघोली पीएमआरडीए अग्निशमन केंद्रातील उपस्थानक अधिकारी विजय महाजन व त्यांचे पथक तसेच एमआयडीसीचे अधिकारी वैभव तांडेल यांनी पथकाच्या मदतीने सुमारे १२ तास अथक प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. बुधवारी दुपारपर्यंत धुराचे लोट दिसत होते.