‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:13 AM2021-09-14T04:13:18+5:302021-09-14T04:13:18+5:30

पुणे : बावधन येथील बिग बास्केटच्या गोदामाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. सुमारे २५ ...

A huge fire broke out in the warehouse of 'Big Basket' | ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग

‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग

Next

पुणे : बावधन येथील बिग बास्केटच्या गोदामाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. सुमारे २५ हजार स्क्वेअर फूट असलेले हे पत्र्याचे संपूर्ण गोदाम या आगीमुळे पूर्णपणे नष्ट झाले आहे. गोदामाच्या लोखंडी सांगाड्याचे चॅनेलही वाकले इतकी भीषण आग होती. आगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाले. पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए व एमआयडीसी येथील एकूण १२ फायरगाड्या व वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग विझविण्यात यश आले. आग लागताच गोदामातील सर्व जण बाहेर आल्याने कोणीही जखमी झाले नाही.

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी मेमाणे यांनी सांगितले की, बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणाऱ्या बिग बास्केट या कंपनीचे सुमारे २५ हजार स्क्वेअर फुटांचे गोदाम आहे. हे गोदाम संपूर्णपणे पत्र्यांचे शेड असून त्याला सुमारे १२ ते १३ शटर होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजता या गोदामाला आग लागली. गोदामाला लागूनच मालाची वाहतूक करणारी वाहने व दुचाकी पार्क केल्या होत्या. त्यांनाही या आगीची झळ बसून ती वाहने पेटवून खाक झाली.

अग्निशमन दलाला रात्री ११ वाजून ३४ मिनिटांनी या आगीची खबर मिळाली. आग इतकी भीषण होती की, त्यात पत्र्याच्या शेडला लावलेले लोखंडी अँगलही वाकले. त्यामुळे आत जाणे धोकादायक बनले होते. पत्रे अस्तावस्त पडल्याने आगीपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. तेव्हा गावातील २ जेसीबीच्या सहाय्याने पत्रे बाजूला करुन ही आग विझविण्यात आली. फायरगाड्यांमधील पाणी संपल्याने पाषाण येथून गाड्या पाणी भरून पुन्हा आणण्यात आल्या होत्या.

तिजोरीतील ८ लाख वाचविले.

आग विझवत असतानाच तेथील व्यवस्थापकाने आत तिजोरी असून त्यात मोठ्या प्रमाणावर पैसे असल्याचे सांगितले. तेव्हा अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी यांनी आत प्रवेश करुन ती तिजोरी बाहेर आणली. त्यातील ८ लाख रुपये वाचविण्यात यश आले. मात्र, तिजोरी जवळील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सुमारे २ लाख रुपये जळून खाक झाले. सुमारे ३ तास ही आग धगधगत होती.

Web Title: A huge fire broke out in the warehouse of 'Big Basket'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.