खासगी रुग्णवाहिका चालकांकडून होतेय प्रचंड लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:41+5:302021-05-10T04:11:41+5:30
मांडवगण फराटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांच्या पुढाकाराने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी ...
मांडवगण फराटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांच्या पुढाकाराने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळत असल्याने परिसरातील रुग्ण येथेच उपचार घेत आहेत. परंतु परिसरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना ये-जा करण्यासाठी येथे स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध नाही. त्यामुळे सदर रुग्णांची गैरसोय होत आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना तपासणी करण्यासाठी अथवा इतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जावे लागले तर येथे रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे बाहेर गावातील रुग्णवाहिका बोलवाव्या लागत आहे. या रुग्णवाहिका अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करीत आहेत. आधीच घाबरलेल्या रुग्णांना ही भाडेवाढ त्रासदायक ठरत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे एक रुग्णवाहिका उपलब्ध आहे परंतु या रुग्णवाहिकेतून गरोदर महिलांना ने-आण करावी लागते. त्यामुळे ही रुग्णवाहिका कोरोनाच्या रुग्णांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही रुग्णवाहिका कोरोनाच्या रुग्णांना उपलब्ध होत नाही. तसेच वडगाव रासाई येथे राव-लक्ष्मी ट्रस्टची रुग्णवाहिका आहे. परंतु ही रुग्णवाहिकासुद्धा अपघाती रुग्ण अथवा इतर आजारांच्या रुग्णांसाठी राखीव आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत नाही. मांडवगण फराटा कोविड केअर सेंटरला एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. परंतु ही रुग्णवाहिका अनेक वर्षांपासून बंद होती. त्यामुळे तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्यामुळे ही रुग्णवाहिका लांब अंतरावर रुग्णांची ने-आण करु शकत नाही. तसेच या रुग्णवाहिकेच्या चालकालाच कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यानेही काम सोडलेले आहे.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. त्याचबरोबर या भागात मृत्यूंची संख्यासुद्धा जास्त आहे. सध्या या भागात रुग्णवाहिका उपलब्ध करायची असल्यास शिरूर किंवा दौंड येथून बोलवावी लागते. त्याचप्रमाणे अन्य ठिकाणाहून सुद्धा वेळेत उपलब्ध होत नाही. तपासणी करून पेशंट पुढे नेण्याची गरज असल्यास सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे. वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास शिरसगाव काटा, इनामगाव, पिंपळसुटी, गणेगाव, बाभूळसर, कुरुळी आदी गावांच्या नागरिकांची गैरसोय थांबणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन या भागतील नागरिकांसाठी स्वतंत्र अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.