म्हाडाच्या नव्या विक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! पुणे विभागातून ३ हजार घरांसाठी तब्ब्ल ५७ हजार नागरिकांनी केला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 03:33 PM2021-06-14T15:33:15+5:302021-06-14T15:33:27+5:30
कोरोना संकटात सहा महिन्यात दोन वेळा घरांची सोडत, आता अर्ज आलेल्या लोकांसाठी घरांची सोडत जून अखेर पर्यंत करण्यात येणार
पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांच्या वतीने सर्वसामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यासह पिंपरी-चिंचवडसह सोलापुर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २ हजार ९०८ घरांची सोडत काढण्यात आली. कोरोनाचे गंभीर संकट असताना देखील म्हाडाच्या घरांना सर्व स्तरातील लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, तीन हजार घरांसाठी तब्बल ५७ हजार लोकांनी अर्ज केला आहे. आता या घरांची सोडत जून अखेर पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी सांगितले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापुर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २ हजार ९०८ घरांची सोडत काढण्यात आली. कोरोना संकट असतानाही सहा महिन्यांत दोन वेळा आणि तेही तब्बल दोन हजार पेक्षा अधिक घरांची सोडत काढण्याचा नवा विक्रम पुणे म्हाडाने केला आहे.
यात सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यातील म्हाडाच्या २ हजार १५३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनेतील प्राप्त झालेल्या ७५५ सदनिका अशा एकूण २ हजार ९०८ सदनिकेच्या अंतिम नोंदणीसाठी १३ मे पर्यंत मुदत होती. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव सदर जाहिरातील योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. घरांसाठी अर्ज करण्यास १३ जूनपर्यंत मुदत होती. आता ही मुदत संपली असून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता जून अखेर पर्यंत ही सोडत काढण्यात येणार असल्याचे नितीन माने-पाटील यांनी येथे सांगितले.