गळाभेट घेतल्याने, सोबत जेवल्याने एड्स नाही आयुष्य वाढते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 03:07 PM2022-11-02T15:07:43+5:302022-11-02T15:08:55+5:30

वाळीत टाकू नका, गळाभेट घ्या...

Hugging, eating together, not AIDS, prolongs life | गळाभेट घेतल्याने, सोबत जेवल्याने एड्स नाही आयुष्य वाढते

गळाभेट घेतल्याने, सोबत जेवल्याने एड्स नाही आयुष्य वाढते

googlenewsNext

पुणे : एचआयव्ही या आजाराबाबत समाजात जागरूकता आहे. तरीपण, अजूनही संसर्ग कसा हाेताे याबाबत काही गैरसमजुती आहेत. तसेच, रक्त तपासणीद्वारे त्याचे निदान हाेत असून, या वर्षभरात आतापर्यंत ६५ हजार जणांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ३९ जण बाधित आढळले.

नऊ महिन्यांत ६५ हजार जणांची तपासणी

गेल्या नऊ महिन्यांत म्हणजे जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेद्वारे महिला, पुरुष, गर्भवती, मुले, मुली, तृतीयपंथी मिळून ६५ हजार ५७३ जणांची एचआयव्हीसाठी तपासणी केली. त्यापैकी १ हजार ३९ जणांना एचआयव्ही असल्याचे निदान झाले. त्यापैकी ५५९ पुरुष तर ३५९ महिला हाेत्या. म्हणजेच बाधित दर हा दीड टक्का इतका आहे. तर त्यापूर्वी ६६ हजार २४७ जणांचे समुपदेशन करण्यात आले.

आठ मुले, मुलीही बाधित

यामध्ये ५८० मुलांची तर ४३१ मुलींचीही एचआयव्हीसाठी चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४ मुले तर ४ मुलीदेखील एचआयव्ही बाधित आढळल्या. तर १३३ तृतीयपंथीयांपैकी १२ जणांना एचआयव्हीची बाधा झाली. तर २१ हजार ८२१ गर्भवतींपैकी ४३ जणांना एचआयव्ही झालेला हाेता.

वाळीत टाकू नका, गळाभेट घ्या

एचआयव्ही किंवा एड्स हा स्पर्शातून पसरणारा आजार नाही. म्हणून एड्सग्रस्ताला वाळीत न टाकता त्याला सोबत घेतले आणि काळजी घेतली तर त्याचे आयुष्य वाढू शकते. एड्सग्रस्तांना वेळेवर औषधे देणे, आजारी पडल्यास उपचार घेणे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याला आपुलकीने वागविणे गरजेचे आहे.

याद्वारे पसरू शकतो एड्स

असुरक्षित लैंगिक संबंध, असुरक्षित रक्त चढवणे, एकापेक्षा अनेकांना एकच सुई मग ती सलाईन, रक्ताची असाे किंवा टॅट्यू काढण्याची असो ती वापरल्याने संसर्गाचा धाेका वाढताे. कारण हा विषाणू रक्ताद्वारे किंवा लैंगिक संबंधाद्वारेच पसरताे.

शहरात वर्षभरातील ९ महिन्यांत १ हजार ३९ जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे निदान झालेले आहे. एचआयव्ही हा स्पर्श किंवा गळाभेट घेतल्याने पसरत नाही. त्यामुळे या रुग्णालाही माणुसकीने वागविणे गरजेचे असते. एचआयव्हीबाबत शंका वाटत असल्यास जवळच्या शासकीय आराेग्य केंद्रांत जाऊन तपासणी करावी. ती माेफत आहे.

- डाॅ. सूर्यकांत देवकर, नाेडल अधिकारी, पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था

Web Title: Hugging, eating together, not AIDS, prolongs life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.