‘सुहाना - प्रवीण मसालेवाले’ चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे पुण्यात निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 06:05 PM2022-06-03T18:05:37+5:302022-06-03T18:09:51+5:30
वृद्धापकाळाने पुण्यात निधन...
पुणे : ‘सुहाना - प्रवीण मसालेवाले’ या उद्योग समुहाचे संस्थापक संचालक हुकमीचंद (भाऊ) सुखलालजी चोरडिया (वय ९३) यांचे आज शुक्रवारी (३ जून) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. हुकमीचंद यांच्या पश्चात पुत्र राजकुमार, डॉ. प्रवीण, प्रदीप, धन्यकुमार, तसेच नातू विशाल आणि आनंद यांच्यासह मोठा परिवार आहे.
मसाले आणि लोणची या उद्योगात हुकमीचंद यांचे नाव मोठे होते. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला होता. कमलबाई यांच्यासोबत लग्नानंतर काही काळ ते सोलापूर जिल्ह्यातही वास्तव्याला होते. तेथे त्यांनी ‘आनंद मसाला’ हा घरगुती मसाले तयार करुन विक्री करण्याचा उद्योग केला होता. पुढे पुण्यात हडपसर परिसरात नोकरी करत असतानाच संध्याकाळी घरोघरी फिरुन मसाले विक्रीला सुरुवात केली होती.
मिरची बियाणे विक्री करता करताच हुकमीचंद यांना मसाला तयार करण्याची कल्पना सुचली होती. त्यामुळे ‘गरम मसाला’ आणि सोबतच ‘कांदा-लसूण मसाला’ तयार करुन घरोघरी विक्रीला त्यांनी सुरुवात केली. १९६० मध्ये त्यांनी ‘प्रवीण मसाले’ या नावाने त्यांनी व्यवसाय सुरु केला. पहिली दहा वर्षे अत्यंत कष्ट करुन पुढे हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथेच त्यांनी मोठी जागा घेऊन १९७२ मध्ये या व्यवसायाचा विस्तार केला.
१९७६ मध्ये सुमारे ५०० किलो लोणचे तयार करुन त्यांनी बाजारात ‘प्रवीण’ ची उत्पादने विक्रीसाठी आणली. त्या व्यवसायाचा विस्तार आता चौथी पिढी करत आहे. भारतभर जवळपास १० कारखाने आणि विक्री केंद्रे उभी करण्यात महत्वाचे मार्गदर्शन हुकमीचंद यांनी केले होते. ‘प्रवीण’ सोबतच ‘सुहाना’ आणि ‘अंबारी’ हे ब्रँड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत.
व्यवसाय करताना अत्यंत आधुनिकता आणि व्यक्तीगत जीवनात अत्यंत साधेपणा जपणे हे हुकमीचंद यांचे वैशिष्ट्य होते. सेंद्रीय शेती हा त्यांचा विशेष आवडीचा विषय होता. शिवाय, व्यापारी पेठांमध्ये ‘कैरी आणि मिरची’ या उत्पादनांमध्ये हुकमीचंद यांचा शब्द प्रमाण मानला जाई. मागील जवळपास २० वर्षे ते प्रत्यक्ष व्यवसायात सक्रीय नव्हते. मात्र, रॉ मटेरियलची निवड करणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसाठी कल्पना सुचवणे, अशा पद्धतीने चोरडिया कुटुंबासह नातेवाईकांच्याही उद्योगांना ते मार्गदर्शन करत असत.