मंगळावर मानवी मोहीम
By admin | Published: May 31, 2017 03:01 AM2017-05-31T03:01:33+5:302017-05-31T03:01:33+5:30
मानवी वास्तव्यासाठी पृथ्वीनंतर मंगळ ही सर्वांत सुरक्षित जागा आहे. मंगळावर पाणी, कार्बनडायआॅक्साइड अशा गोष्टी
पुणे : ‘मानवी वास्तव्यासाठी पृथ्वीनंतर मंगळ ही सर्वांत सुरक्षित जागा आहे. मंगळावर पाणी, कार्बनडायआॅक्साइड अशा गोष्टी मूलभूत प्रमाणात असल्याने जगामधील काही कंपन्यांनी मानवाला मंगळावर पाठवण्याची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. नासादेखील इस्रोच्या सहकार्याने मंगळावर मानवी मोहीम आखण्याच्या तयारीत आहे’, असे सुतोवाच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक यांनी मंगळवारी केले. इस्रोच्या चांद्रयान आणि मंगळयान या मोहिमांमुळे अंतराळ क्षेत्रात संपूर्ण जग भारताकडे आदराने पाहत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे डॉ. श्रीकांत कार्लेकर यांच्या ‘पृथ्वीजिज्ञासा’ या पुस्तकास स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार व अरुण करमकर यांच्या ‘पोलादी राष्ट्रपुरुष’ या पुस्तकास चेतना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून
डॉ. नाईक बोलत होते. धनंजय बर्वे, अरुण करमरकर, श्रीकांत कार्लेकर, दिलीप ठकार, डॉ. अनुजा कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. नाईक म्हणाले, ‘प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज यांनी काही दिवसांपूर्वी पृथ्वी शंभर वर्षे टिकेल, असे विधान केले आहे. त्यामध्ये कल्पनाविलास किंवा रंजकता नसून त्यामागे अभ्यासपूर्ण संशोधन आहे. पुढील शंभर वर्षांत मनुष्याला इतर ग्रहांचा आधार घ्यावा लागू शकतो. पृथ्वीनंतर मंगळ ग्रह मनुष्यासाठी सर्वांत सुरक्षित जागा आहे. तेथील तापमान, वातावरण पृथ्वीशी मिळतेजुळते आहे. त्यामुळेच भविष्यात मंगळाकडे पर्यायी जग म्हणून पाहिले जाईल.’
‘चंद्र हा उपग्रह पृथ्वीच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे. परंतु, तेथील तापमान आणि वातावरणाचा विचार केला तर मनुष्याच्या दृष्टीने ते घातक आहे. त्यानंतर सर्वांत जवळ शुक्र आहे. तेथील तापमानही पृथ्वीच्या प्रमाणात खूप जास्त आहे, असेही ते म्हणाले.
अरुण करमरकर आणि श्रीकांत कार्लेकर यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विषद केली. ‘सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्याकडे भारतीय राजकारणाने अनेक वर्षे दुर्लक्ष केले आहे. त्यांचे कार्य लोकांसमोर यावे, या हेतूने हे पुस्तक लिहिले असल्याचे’ करमरकर यांनी सांगितले. पृथ्वीला मनुष्याने समजून घेण्याची गरज असल्याचे कार्लेकर यांनी नमूद केले. चारूदत्त निमकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.