निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढतोय; म्हणूनच दरड कोसळण्याच्या घटनेतही वाढ - माधव गाडगीळ
By श्रीकिशन काळे | Published: July 20, 2023 08:24 PM2023-07-20T20:24:40+5:302023-07-20T20:25:07+5:30
देशभरात दरड कोसळण्याच्या घटनांत शंभरपटीने वाढ, सरकार करतंय काय? गाडगीळ यांचा सवाल
पुणे :‘‘देशात विकासाच्या नावाखाली निसर्ग आणि नागरिकांच्या अधिकारांना बाजूला ठेवले जात आहे. पश्चिम घाटाचा अभ्यास करून मी २०११ मध्येच केंद्र सरकारला अहवाल दिला आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आज शंभर पट्टीने दरड कोसळण्याच्या घटना होत आहेत. हे केवळ आपल्याकडेच नव्हे, तर देशभरात होत आहे, सरकार करतेय काय?’’ असा सवाल ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगड येथे बुधवारी रात्री दरड कोसळून त्याखाली इर्शाळवाडी गाव दबले गेले. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा डॉ. गाडगीळ यांनी सादर केलेला पश्चिम घाटावरील अहवालाचा मुद्दा समोर आला आहे. डॉ. गाडगीळ यांनी अभ्यास करून २०११ मध्ये केंद्र सरकारकडे हा अहवाल दिला. केंद्र सरकारनेच समिती स्थापन करून डॉ. गाडगीळ यांना अहवाल करायला सांगितले होते. परंतु, तो अहवाल स्वीकारण्यात आला नाही. त्यामध्ये पश्चिम घाटातील भाग संरक्षित करणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. हा अहवाल विकासविरोधी असल्याची टीका केल्याने तो बासनात गेला. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम घाटात रस्ते करणे, खोदकाम करणे, खाणी तयार करण्याचे काम सुरू आहे. परिणामी भुस्खलन होत आहे. या सर्व प्रकारावर डॉ. गाडगीळ यांनी खंत व्यक्त केली.
...म्हणून हाेतेय भूस्खलन
इर्शाळगड सारख्या घटना देशभरात होत आहेत. पश्चिम घाटात गेल्या दहा वर्षांमध्ये दरडींचे प्रमाण शंभर पट वाढले आहे. मी २०११ मध्ये अहवाल केंद्राकडे पाठविला होता. त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये दरडी कोसळण्यात आणखी भर पडत आहे. सध्या जोरदार पाऊस पडत आहे. निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढत आहे. पश्चिम घाटात तर दगडखाणी आणि रस्ते तयार करण्यासाठी खूप हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे भूस्खलन होत आहे, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी सांगितले.
पश्चिम घाटात अतिसंवेदनशील असलेला भाग ३० टक्के
आम्ही अहवालात दिले आहे की, पश्चिम घाटातील काही भाग विशेष संवेदनशील आहे. तीन पद्धतीचे संवेदनशीलता आहे. अति संवेदशनील, दुसरी मध्यम संवेदनशील आणि तिसरी कमी संवेदनशील. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ वनस्पती, वन्यजीव आहेत. निसर्गातील हस्तक्षेप थांबविणे आवश्यक आहे. पश्चिम घाटात अतिसंवेदनशील असलेला भाग ३० टक्के आहे. तो सर्व संरक्षित करायला हवा. पश्चिम घाटातील दगडखाणी तातडीने थांबवायला पाहिजेत. मानवाचे आणि निसर्गाचे अधिकार शाबूत ठेवून कामे व्हावीत. बहुजन हिताय, बहुजन सुखाय असा विकास व्हावा. - डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ