अण्णा भाऊ साठे जातीचे वर्तुळ तोडणारे मानवतावादी : डॉ. श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:00+5:302021-08-01T04:11:00+5:30
पुणे : कलावंत, विचारवंत आणि प्रतिभावंताला जात नसते. जातीचे वर्तुळ तोडणारे अण्णा भाऊ साठे खरे मानवतावादी होते. त्यांचे विचार ...
पुणे : कलावंत, विचारवंत आणि प्रतिभावंताला जात नसते. जातीचे वर्तुळ तोडणारे अण्णा भाऊ साठे खरे मानवतावादी होते. त्यांचे विचार पचवायचे असतील तर अंशत: का होईना, त्यांच्या प्रमाणे जगता आले पाहिजे. महापुरुषांच्या वैचारिक, सांस्कृतिकवादाच्या बेरजेची देणगी देणारे ते देशातील पहिली व्यक्ती आहेत, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संवाद पुणे आयोजित, सानिध्य प्रकाशन प्रकाशित आणि ‘पोतराज’कार संपत जाधव लिखित अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकशाहीर’ या दोन अंकी नाट्य संहितेचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी स्थायी समिती सदस्य, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे आणि लेखक संपत जाधव, सुरेश देशमुख, नाट्यगृह व्यवस्थापक सुनील मते , प्रकाशक केतकी जाधव आणि अतुल जाधव उपस्थित होते.
उपस्थित होते.
‘लोकशाहीर’ हे नाटक वर्षभरात रंगमंचावर आणण्याचा मनोदय व्यक्त करीत सुनील महाजन यांनी पुणे शहरातील महापालिकेच्या इतर नाट्यगृहांचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा केला जातो, त्याचप्रमाणे अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचाही वर्धापन दिन साजरा केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विनंतीला तत्त्वत: मान्यता देऊन नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी नाट्यगृहाच्या आवारात अण्णा भाऊ साठे यांची विविध तैलचित्रे लावण्याचा मानस व्यक्त केला.
डॉ. धनंजय भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले.
---------------------------------