मानवतावादाचे विचार देशाला तारू शकतील - लक्ष्मीकांत देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 12:32 AM2018-12-26T00:32:42+5:302018-12-26T00:33:01+5:30
मानवतावाद, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच विचार देशाला तारू शकतील. यासाठी साहित्यकलेचा प्रचार करून तरुण पिढीने वाचन संस्कृती जपावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर - मानवतावाद, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच विचार देशाला तारू शकतील. यासाठी साहित्यकलेचा प्रचार करून तरुण पिढीने वाचन संस्कृती जपावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर येथील साहित्यप्रेमी मंडळाच्या वतीने बारामती येथे रविवारी (दि. २३) काव्यसागर या राज्यस्तरीय कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप अध्यक्षस्थानी होते. या वेळी तहसीलदार हनुमंत पाटील, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, शैलेश रासकर, उद्योजक राजेंद्र जगताप, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, महसूल विभागाचे निवृत्त उपायुक्त शिवाजी राजेनिंबाळकर, डॉ. जया कदम, संभाजी गायकवाड यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले साहित्यिक व कवी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद आणि सेक्युलरवाद ही सूत्रे समाजामध्ये अवलंबून आपल्याला वाटचाल करायची आहे. जात, धर्म विरहित माणूस घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी नवोदित कलावंतांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.’’
सोमेश्वरचे अध्यक्ष जगताप यांच्यासह चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. राज्याच्या विविध भागांतील साहित्यिक आणि कवींना या वेळी कृतज्ञता सन्मान, राज्यस्तरीय साहित्यरत्न आणि जीवनगौरव साधना पुरस्कार देऊन गौरविले. साहित्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष प्रा. हनुमंत माने यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रकाश गायकवाड यांनी संयोजन केले.
संस्कृती आणि साहित्य वाचणाराच देश मोठा
सत्य, शिव आणि सुंदर विचार केल्यानेच माणसाची वाटचाल पशुसंस्कृती ते देवसंस्कृती अशी झाली आहे. आदर्श असणाऱ्या ‘रामायण’ या महाकाव्यातून बोध घेण्याची गरज आहे. साहित्य, कला, संगीत, क्रीडा या क्षेत्रांत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे आहे. संस्कृती आणि साहित्य वाचणाराच देश मोठा असतो, असे देशमुख म्हणाले.