मानवता परमो धर्म : मोफत उपचार करून अपंग गायीला बसवला 'कृत्रिम' पाय;पुण्याजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 01:09 PM2020-08-10T13:09:14+5:302020-08-10T13:12:14+5:30
कृत्रिम अवयव बसवणे मानवी लोकांमध्ये सामान्य आहे. मात्र, प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया फार दुर्मिळ...
पुणे : पुण्यामधील चौफुला गावातील एका गायीसाठी कृत्रिम पाय तयार करण्यात आला आहे. या कृत्रिम पायाच्या मदतीने लवकरच ही गाय ल चार पायांवर चालू शकणार आहे. अपंग गायीवर शस्त्रक्रिया करून २ ऑगस्ट रोजी हा कृत्रिम पाय बसवण्यात आला. गायीला तीनच पाय होते. गावकऱ्यांनी तिला संचेती रूग्णालयातील प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स विभागातील डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी गायीसाठी कृत्रिम पाय तयार करण्याचे आव्हान स्विकारले आणि सर्व उपचार मोफत देण्यात आले.
संचेती रुग्णालयाच्या प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स विभागाचे प्रमुख डॉ. सलिल जैन म्हणाले, 'कृत्रिम पाय तयार करण्यासाठी आम्ही त्या पायाचे माप दोन आठवड्यांपूर्वीच घेतले. माझ्या टीमने गायीच्या शरीररचनेचा अभ्यास केला आणि त्यानंतर कृत्रिम पायाची रचना तयार केली. वजनदार प्राण्यांच्या अवयवांची रचना करणे अवघड असते. कृत्रिम पाय लावल्यावर ही गाय आता उभी राहण्यास सक्षम असून ती हळूहळू चालू शकत आहे. परंतु, कृत्रिम पायाशी जुळवून घेण्यासाठी तिला जवळपास एका महिन्याचा कालावधी लागेल. आम्ही तिच्या पायाच्या हालचालींवर आणि त्यामध्ये होणाऱ्या प्रगतीवर लक्ष ठेवत आहोत. गावकरी अमर जगताप ज्यांनी या गायीच्या कृत्रिम पायाच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला.
-------
कृत्रिम अवयव मानवी लोकांमध्ये सामान्य आहे. मात्र प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया फार दुर्मिळ आहे. जास्त वजन असलल्या प्राण्यांसाठी प्रोस्थेटिक्स एक असामान्य गोष्ट आणि आव्हानात्मक कार्य आहे. प्राण्यांवर हे करण्यासाठी अनेक चाचण्या व त्रुटी पडताळून पाहणं आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी एका तीन पायांच्या गाढवावर आम्ही ही प्रक्रिया केली होती. गाढवाला कृत्रिम पाय बसवल्यावर यश मिळाल्यानंतर यावर्षी आम्ही गायीवर ही प्रक्रिया केली. अशा समस्या असलेल्या अनेक प्राण्यांना आम्ही मदत करू शकू.
- डॉ. पराग संचेती, संचेती इंस्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडीक आणि रिहॅबिलीटेशनचे प्रमुख
-------
प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी रूग्णालयाच्या या कामगिरीचं कौतुक केले आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, प्राण्यांसाठीच्या कृत्रिम गोष्टी तयार करण्यासाठी अधिकाधिक संशोधन केले पाहिजे. पेटा इंडियाचे सीईओ मणिलाल वल्लीयाते म्हणाले, 'वजनदार प्राण्यांसाठीच्या कृत्रिम पायाची प्रक्रिया आव्हानात्मक असते. यामध्ये वजनाचा योग्य प्रमाणात समतोल राखण्याबाबत खबरदारी घेतली पाहिजे.जनावरांसाठी देशात असे आणखी उपक्रम आवश्यक आहेत.