माणुसकी जिवंतय, पूरग्रस्तांना मदत करताय, पण गरजूंपर्यंत ती पोचतेय ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:56+5:302021-07-27T04:10:56+5:30

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार, रोजगार होत्याचे नव्हते झाले. महाड, चिपळूण, तसेच कोकणातील काही भागांसह सातारा, ...

Humanity helps flood victims, but does it reach the needy? | माणुसकी जिवंतय, पूरग्रस्तांना मदत करताय, पण गरजूंपर्यंत ती पोचतेय ना?

माणुसकी जिवंतय, पूरग्रस्तांना मदत करताय, पण गरजूंपर्यंत ती पोचतेय ना?

Next

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार, रोजगार होत्याचे नव्हते झाले. महाड, चिपळूण, तसेच कोकणातील काही भागांसह सातारा, कोल्हापूर, सांगली भागातील नागरिकांना मोठा फटका बसला. पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी विविध स्तरांतून आवाहन केले जात आहे. मदत दिल्यानंतर त्याची शहानिशा करण्याची गरज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.

------------------------

पूरग्रस्त परिस्थितीनंतर सोशल मीडिया सक्रिय झाला आहे. माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत. अनेकांना मदत करण्याची इच्छा असते. मात्र, ती कशी आणि कोणाच्या माध्यमातून करावी, याबाबत संभ्रम असतो. संकटग्रस्त भागात कोणत्या वस्तूंची किती गरज आहे, याचा आढावा घेणारी मध्यवर्ती यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. यंत्रणेच्या माध्यमातून व्यक्ती, स्वयंसेवी संस्था पुढे येऊ शकतात.

- विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते

-------------------------------

भोई प्रतिष्ठानतर्फे सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरात मदत पथक कार्यरत झाले आहे. ज्या गावात मदत दिली जाणार आहे, त्या भागात मी २ दिवस जाऊन राहून, परिस्थितीचा आढावा घेऊन आलो. तेथील नागरिकांना तातडीने कोणत्या वस्तूंची गरज भासणार आहे आणि काही दिवसांनी कोणत्या गोष्टींची गरज भासेल याचा अभ्यास करून त्याप्रमाणे मदत पुरवली जाणार आहे. मदत योग्य रीतीने पोहोचण्यासाठी आपल्या संपर्कातील स्थानिक कार्यकर्त्यांची टीम कार्यरत हवी. संबंधित भागातील डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून मदतीबाबत अंदाज घेता येतो.

- डॉ. मिलिंद भोई, भोई प्रतिष्ठान

---------------------------

जुने कपडे देऊ नका, मदतीचे फोटो काढू नका

अडकलेल्या लोकांना आधी सुखरूप बाहेर पडणे आणि नंतर पुनर्वसन हा क्रम संस्थांनी लक्षात घ्यावा. लोकांची राहण्याची सोय झाल्यानंतरच त्यांना किराणा सामान दिल्यास ते नीट वापरू शकतील. आपण वस्तू स्वरूपात मदत जमा करत असाल, तर आपले ठिकाण ते घटनास्थळ इथपर्यंत सामान नेण्यासाठी लागणाऱ्या वाहतूक खर्चाचा अंदाज घ्या. सौम्य, मध्यम व तीव्र बाधित गावांची, त्यातील कुटुंबांची, माणसांची यादी करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. आपण मदत करतोय; उपकार नाही. त्यामुळे मदत घेताना व्यक्तींचे फोटो काढू नका. ते परिस्थितीने लाचार आहेत, त्यांचा स्वाभिमान दुखावेल असे वागू नका. शक्यतो घटनास्थळाजवळ काम करणाऱ्या स्थानिक संस्थेला आर्थिक मदत द्या किंवा तुम्ही थेट ओळखत असाल अशा संस्थेलाच मदत करा. जुने कपडे देऊ नका. जुने कपडे धुऊन वापरणे पूरस्थितीत शक्य नाही. त्याने वेगवेगळे संसर्ग होऊ शकतात. ज्या वस्तू तुम्ही स्वत: घरात वापराल, त्याच वस्तू द्या.

- सचिन आशा सुभाष, समाजबंध संस्था

Web Title: Humanity helps flood victims, but does it reach the needy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.