कचरा वेचणाऱ्या महिलेने घडविले माणुसकीचे दर्शन ;एक दिवसाच्या अर्भकाला मिळाले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 02:00 PM2019-12-18T14:00:57+5:302019-12-18T14:03:23+5:30
कापडी स्कार्फमध्ये नवजात अर्भक गुंडाळून त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकलेले होते...
पुणे : कचऱ्याच्या डब्यात एक दिवसाचे नवजात अर्भक सापडल्याचा धक्कादायक प्रकार विश्रांतवाडीत बुधवारी सकाळी घडला. नवजात अर्भकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथील स्नेहगंध अपार्टमेंट या इमारतीतील सकाळी कचरा गोळा करणाऱ्या सफाईसेविका लक्ष्मी ढेंबरे यांना कचऱ्याच्या डब्यात हालचाल जाणवली. एका कापडी स्कार्फमध्ये नवजात अर्भक गुंडाळून त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकलेले होते. त्यांनी ते अर्भक बाहेर काढून पाहिले. तात्काळ त्यांनी इतर महिला कर्मचाऱ्यासोबत ही माहिती महापालिका आरोग्य निरीक्षक यांना दिली. आळंदी रोड चौकीतील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ हे स्त्री जातीचे नवजात अर्भक ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आज या घटनेमुळे पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासला आहे.एक दिवसाच्या नवजात जिवंत अर्भकाला कचऱ्याच्या डब्यात टाकण्याचे दुष्कृत्य आज सकाळी उघडकीस आले. पण नशीब बलवत्तर म्हणून या नवजात अर्भकाला जीवदान मिळाले. पण एका कचरा वेचणाऱ्या महिला स्वच्छता सेविकेने मात्र माणुसकीचे दर्शन घडवित त्या अर्भकाला पोलिसांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी ससून रूग्णालयात पाठवले.