ग्राऊंड रिपोर्ट - झोपडपट्टयांमध्ये माणसंच राहतात; आमचा कोंडवाडा करु नका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 07:00 AM2020-04-19T07:00:00+5:302020-04-19T07:00:08+5:30

रोजगार गेला, अन्नधान्य महागले, जगायचे कसे? 

Humans live in slum areas; Don't Closed to us | ग्राऊंड रिपोर्ट - झोपडपट्टयांमध्ये माणसंच राहतात; आमचा कोंडवाडा करु नका

ग्राऊंड रिपोर्ट - झोपडपट्टयांमध्ये माणसंच राहतात; आमचा कोंडवाडा करु नका

Next
ठळक मुद्देपुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढसर्वसामान्य नागरिकांनंतर आता डॉक्टरलाच कोरोनाचे संक्रमण झाल्याने नागरिक हवालदिल पालिकेच्या प्रस्तावावरुन महर्षीनगर , गुलटेकडी पासून आरटीओपर्यंतच भाग पहिल्या टप्प्यात सील

लक्ष्मण मोरे -
पुणे : आमचा रोजगार गेला... हातात पैसा नाही... अन्नधान्य महाग झालंय... लोकांनी पदरात टाकलेल्यावर जगतोय... आम्हाला जसं काही कैद करुन टाकलंय... आजार श्रीमंतानं आणला आणि मरण गरीबाचं झालं... साहेब झोपडपट्टयांमध्ये माणसंच राहतात... त्यांचा कोंडवाडा करु नका... अशी आर्त आर्जवं करण्याची वेळ गुलटेकडी परिसरातील झोपडपट्टयांमधील नागरिकांवर आली आहे.

पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यातही भवानी पेठ या दाटीवाटीच्या भागात शहरातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. हा भाग झोपडपट्टीबहूल आहे. पालिकेच्या प्रस्तावावरुन महर्षीनगर , गुलटेकडी पासून आरटीओपर्यंतच भाग पहिल्या टप्प्यात सील करण्यात आला. गुलटेकडी परिसरातील मिनाताई ठाकरे वसाहत आणि डायस प्लॉट या दोन झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. ठाकरे वसाहतीमध्ये आतापर्यंत पाच रुग्ण आढळून आले असून यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर , डायस प्लॉटमध्ये आढळून आलेल्या रुग्णांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ठाकरे वसाहतीमध्ये आढळून आलेल्या रुग्णांमध्ये येथे प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचाही समावेश आहे. हा डॉक्टर सध्या सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. 
सर्वसामान्य नागरिकांनंतर आता डॉक्टरलाच कोरोनाचे संक्रमण झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये सोडीयम हायपोक्लोराईडच्या फवारणी व्यतिरीक्त अन्य फारशी खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. पालिका प्रशासनाने केवळ वस्त्यांमध्ये जाणारे रस्ते बंद केले. त्यानंतर छोटेमोठे रस्ते थेट पत्रे लावूनच बंद केले. एकीकडे रोजगार बंद असल्याचे जगण्याचा संघर्ष सुरु झाला आहे. मुलाबाळांचे पोट कसे जगवायचे असा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडून कोरोनाची साथ झोपडपट्ट्यांमध्ये पसरु नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याऐवजी त्यांचा संपर्क तोडण्याचे काम सुरू आहे. 
वस्त्यांमध्ये लोक ऐकत नाहीत, सतत रस्त्यावर येतात, तरुणांची टोळकी रस्त्यावर उभी असतात असे पोलीस आणि पालिकेचे अधिकारी सांगतात. परंतू, झोपडपट्ट्यांमधील घरे अत्यंत दाटीवाटीची आहेत. आठ बाय दहा, दहा बाय बारा फुटांच्या खोल्यांमध्ये जागा अत्यंत कमी असते. याच खोलीत स्वयंपाकाचा ओटा, बाथरुम,आंथरुन-पांघरुण ठेवण्याची जागा, भांडी ठेवण्याच्या मांडण्या अशी साहित्याची गर्दी आणि माणसांची दाटीवाटी. एकाचवेळी घरातील पाच सहा माणसं घरात बसू शकत नाहीत की झोपू शकत नसल्याची परिस्थिती. काही काही घरांमध्ये तर पाय पसरायलाही जागा नसते. अशा खुराड्यांमध्ये जगणारी ही माणसं आता पोटाची लढाई लढायची कि कोरोनाशी मुकाबला करायचा अशा विवंचनेत आहेत. 

======= 
पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाने काही दिवसातच सार्वजनिक व्यवहारांवर निर्बंध आणायला सुरुवात केली. देशभरात लॉक डाऊन लागू करण्यात आला. पुण्यातही कलम १४४ ची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली. त्याचा पहिला फटका स्वाभाविक कष्टकरी वगार्ला बसला. रिक्षा चालक, मोलमजुरी करणारे, कचरा वेचक, मोलकरणींपासून हर त-हेची कामे करणारे कष्टकरी एका झटक्यात घरी बसले. सर्वांचा रोजगार एका क्षणात बंद झाला. असंख्य असंघटीत कामगारांच्या हातचा रोजगार बंद झाला. त्यातील किती जणांच्या हाताला पुन्हा काम मिळेल ही शंकाच आहे. 

====== 
लोकांकडे हातात पैसे नाहीत. दैनंदिन खर्च कसे भागवायचे अशा विवंचनेत असतानाच किराणा मालासह भाजीपाल्याचे दर वाढवण्यात आले आहेत. व्यापारी लोकांना उधारीवर किराणा द्यायला तयार नाहीत. त्यामुळे लोकांनी खायचे काय असा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांनी वाटलेल्या अन्नधान्यावर  कशीबशी गुजराण सुरु आहे. त्यातच कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने नागरिक घाबरुन गेले आहेत. प्रशासन कोणतीही खबरदारी घेत नाही.
- बाबासाहेब साळवे, मिनाताई ठाकरे वसाहत 

===== 

झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता प्रशासकीय पातळीवरुन कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. एकदाच सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. परंतू, स्वच्छतागृहे अत्यंत घाण आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली नाही. त्यांना आजाराचे गांभीर्य पटवून देण्यात आले नाही की तसा कोणी प्रयत्नही केला नाही. कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यावर पत्रे लावून त्यांचेच मार्ग बंद करण्यात आले आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये माणसे राहतात याचा प्रशासनाला विसर पडला आहे.- मल्लेश नडगेरी, डायस प्लॉट झोपडपट्टी. 

Web Title: Humans live in slum areas; Don't Closed to us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.