सलग १२ तास जादूचे प्रयोग करून रसिकांचे केले हास्यमनोरंजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:45+5:302021-05-31T04:09:45+5:30
पुणे : तीन जादूगार मित्रांचा सलग बारा तासांचा ऑनलाइन प्रयोग रंगला. या कार्यक्रमाचे कारण काहीसे वेगळेच होते. कोरोनामुळे कलाक्षेत्र ...
पुणे : तीन जादूगार मित्रांचा सलग बारा तासांचा ऑनलाइन प्रयोग रंगला. या कार्यक्रमाचे कारण काहीसे वेगळेच होते. कोरोनामुळे कलाक्षेत्र ठप्प झाल्याने जगायचं कसं? असा प्रश्न पडलेल्या कलाकार आणि बॅकस्टेज आर्टिस्टच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी हा प्रयोग या तीन जादूगारांनी साकार केला.
रविवारी (दि. ३०) सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत त्यांनी शेकडो जादूंच्या सादरीकरणामधून रसिकांचे मनोरंजन केले. या प्रयोगाला तिकीट लावले नव्हते. आमची १२ तासांची मेहनत तुम्हाला भावली तरच फक्त ९९ रुपयांची मदत करा, असे आवाहन त्यांनी केले होते.
पुण्याचा जादूगार प्रसाद कुलकर्णी, भुजंग वाघ आणि रायगडचा भरत काकडे अशी या तीन जादूगार मित्रांची नावे आहेत. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे संपूर्ण कलाक्षेत्र बंद आहे. या क्षेत्रावर गुजराण करणारे सहायक कलावंत, बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्यासह जादूगार, लोककलावंत यांना मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसला आहे.या कलाकारांच्या सहकार्यासाठी समाजातील अनेक घटक, संस्था पुढे आल्या आणि त्यांना विविध माध्यमातून मदतदेखील केली. परंतु त्यांच्या बाकी गरजा जसे की लाईटबिल, घरभाडे, पेट्रोल, मेडिकल यासाठी खिशात पैसाच शिल्लक राहिला नाही. एवढे दिवस लाईमलाईटमध्ये राहिल्यावर आता या परिस्थितीत कोणापुढे कसा हात पसरायचा याच विचाराने कलाकार मेटाकुटीला आला. पण कोणालाही मदत मागितली नाही. परंतु त्यांची हीच हतबलता या तीन जादूगार मित्रांनी जाणली आणि त्यांनी हा प्रयोग केला.
या कार्यक्रमासाठी कोणतेही मानधन न घेता तिघांनी कला सादर केली. या कार्यक्रमामधून संकलित झालेली रक्कम ते गरजू कलाकारांना देणार आहेत. तुम्ही घरी बसून संपूर्ण कुटुंबासह जादूचा आनंद लुटा. आपण हिंदी सिनेमा बघायला जाताना तो चांगला आहे की वाईट हे माहीत नसतानाही प्रत्येकी पाचशे-सहाशे रुपयांचे तिकीट सहज काढतो. परंतु इथे तुम्ही आधी आमचा कार्यक्रम बघा आणि जर तुमच्या मुलांच्या, कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो तरच मदत करा. ही मदत कलाकारांना खूप मोठी ठरणार आहे, असे आम्ही आवाहन केले होते. सलग बारा तासांचा या प्रयोगाला रसिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे जादूगार भुजंग वाघ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
-----------------------