विनोदाला वाचक मिळत नाहीत : श्रीनिवास भणगे; पुण्यात कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 07:13 PM2018-01-20T19:13:46+5:302018-01-20T19:15:58+5:30
गेली अनेक वर्षे, दृश्य माध्यमं आणि विनोदी वक्ते-लेखक लोकप्रिय झाल्याने विनोदाला प्रेक्षक भेटतात,पण वाचक भेटत नाहीत' अशी खंत विख्यात लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे यानी व्यक्त केली. कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते.
पुणे : गेली अनेक वर्षे, दृश्य माध्यमं आणि विनोदी वक्ते-लेखक लोकप्रिय झाल्याने विनोदाला प्रेक्षक भेटतात,पण वाचक भेटत नाहीत' अशी खंत विख्यात लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे यानी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. 'दिवस असे की'या विनोदी कथासंग्रहासाठी हा पुरस्कार लेखिका दीपा मंडलिक,मुंबई यांना श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशक सायन पब्लिकेशन,पुणे यानाही हा पुरस्कार देण्यात आला. समारभाच्या अध्यक्षस्थानी मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी हे होते. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिता राजे पवार, लेखिका शकुंतला फडणीस, दीपा मंडलिक उपस्थित होते.
'विनोदाची मूलभूत तत्वे सांगून,बुद्धीला चालना देणारा विनोद सध्या अभावाने आढळतो याकडेही भणगे यांनी लक्ष वेधले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना मिलिंद जोशी म्हणाले, चिं. वि. जोशींचा विनोद हा उपहास करणारा नव्हता, परिहास साधणारा होता. स्वत: वर केलेला विनोद श्रेष्ठ ठरतो आणि हास्य लोपणं ही सांस्कृतिक अधोगती ठरते,म्हणून विनोदी साहित्य अधिक आले पाहिजे.
सुवर्णा दिवेकर आणि शकुंतला फडणीस यांच्या निवड समितीने या पुरस्कारासाठी ग्रंथनिवड केली. शकुंतला फडणीस यानी चिं. विं.च्या आठवणी जागवल्या आणि निवड केलेल्या पुस्तकाची समीक्षा केली. पहिल्याच पुस्तकाला, चि. विं. सारख्या दिग्गज विनोदी साहित्यिकाच्या नावाचा, म. सा. प.चा पुरस्कार मिळाल्याने हुरुप वाढला असल्याची भावना दीपा मंडलिक यांनी व्यक्त केली. म. सा. प. चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यानी प्रास्ताविक केले तर कार्यवाह बण्डा जोशी यानी सूत्रसंचालन केले. कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी आभार मानले.