एकिकडे टॅंकरने पाणीपुरवठा तर दुसरीकडे शेकडाे लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 03:23 PM2018-04-26T15:23:22+5:302018-04-26T15:23:22+5:30
पुण्यातील काही भागात पाणी टंचाईमुळे टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत असताना विश्रांतवाडीमध्ये रस्त्याच्या मधाेमध असलेल्या पाईपलाईन मधून पाण्याची गळती हाेत असून शेकडाे लिटर पाणी दरराेज वाया जात अाहे.
पुणे : पुण्यात पाणी मुबलक प्रमाणात असल्याचे अाधी म्हंटले जात असे. परंतु पुण्याच्या कक्षा रुंदावत गेल्यामुळे पुण्यात पाण्याची टंचाई निर्माण हाेण्यास सुरुवात झाली. पुण्याच्या वाढत्या लाेकसंख्येमुळे पुण्याच्या पाणी साठ्यांवर त्याचा ताण पडत असल्याचे चित्र अाहे. पुण्यातील काही भागांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ अाली अाहे. असे असताना विश्रांतवाडी येथील रस्त्याच्या मधाेमध असलेल्या पाईपलाईन मधून राेज पाण्याची गळती हाेत असल्याने शेकडाे लिटर पाणी वाया जात अाहे.
पुण्यात अाता पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली अाहे. शहराच्या विविध भागात वेगवेगळ्या वेळेनुसार पाणी साेडण्यात येते. महापालिकेकडून वेळाेवेळी पाणी वाचविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते. परंतु नागरिकांमध्ये जनजागृती करणारी महापालिका स्वतः जागृत हाेणार का असा प्रश्न अाता निर्माण झाला अाहे. कारण पुण्यातील विश्रांतवाडीतील साठे बिस्किट ते प्रतीकनगर येथील रस्त्याच्या मध्ये गेल्या काही वर्षांपासून पाण्याची गळती हाेत अाहे. या भागातून रस्त्याच्या खालून गेलेल्या पाईपलाईन मधून ही पाणी गळती हाेत अाहे. एखाद्या नैसर्गिक झऱ्याप्रमाणे येथून पाणी येत असते. त्यामुळे दरराेज शेकडाे लिटर पाणी येथे वाया जात असते. पाण्याचा फाेर्स अधिक नसला तरी येथील गळतीमुळे रस्त्याच्या मधाेमध पाण्याचे तळे तयार झाले अाहे. या ठिकाणावरुन वेगात वाहने जात असल्याने पाण्यातून घसरून दुचाकीचालक पडण्याची शक्यता अाहे. येथून जवळ असलेल्या धानाेरी व इतर भागातील काही ठिकाणी पाणी येत नसल्याने टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागताे. तसेच काही ठिकाणी रात्री 12 वाजता पाणी येत असते. त्यामुळे नागरिकांना उशीरापर्यंत जागून पाणी भरावे लागते असे असताना दुसरीकडे शेकडाे लिटर पाणी वाया जात असल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली अाहे. त्याचबराेबर लवकरात लवकर या ठिकाणची गळती राेखण्यात यावी अशी मागणीही अाता नागरिक करत अाहेत.