Pune: कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने १०० जणांना फसवून घातला ६५ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 02:56 PM2021-12-08T14:56:09+5:302021-12-08T17:44:38+5:30
पुणे : कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून ९० ते १०० जणांकडून पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या कुबेर शक्ती मल्टी पर्पजच्या ...
पुणे : कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून ९० ते १०० जणांकडून पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या कुबेर शक्ती मल्टी पर्पजच्या संचालकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. शिरीष ऊर्फ ओम ज्ञानदेव खरात (वय ३८, रा. नाशिक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याबरोबर शादाब गुलाम शेख (रा. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १७ सप्टेंबर ते ७ डिसेंबर अशा ३ महिन्यात घडला आहे.
याप्रकरणी जितेंद्र चंद्रभान शुक्ला (वय २८, रा़ कात्रज, आंबेगाव) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरीष खरात याने खराडी येथील प्राईड आयकॉन व उत्तम प्लाझामध्ये कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लि़ या नावाने कार्यालये थाटली. ९० ते १०० लोकांना कर्ज काढून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. तुम्ही डिपॉझिट भरा, त्याच्या ६ पट कर्ज देतो, असे सांगून कोणालाकडून २५ हजार, कोणाकडून ३० हजार रुपये घेतले. त्यांना कागदोपत्री कर्ज मिळाल्याचे दाखविले. त्यामुळे आणखी काही लोक त्याच्याकडे आले. अशा प्रकारे त्याने १०० हून अधिक लोकांकडून डिपॉझिटच्या नावाखाली पैसे गोळा केले आहेत. मात्र, अनेक दिवस झाले तरी कर्ज मिळाले नाही व डिपॉझिट म्हणून भरलेले पैसेही परत देत नसल्याचे लोकांना शंका आली. त्यांनी चंदननगर पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी शिरीष खरात याला अटक केली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांनी सांगितले की, खरात हा मुळचा नाशिकचा राहणारा आहे. त्याने तीन महिन्यांपूर्वी येथे ऑफीस सुरु केले होते. कर्ज देतो, म्हणून त्याने पैसे भरायला सांगून शेकडोंची फसवणूक केली आहे. पोलिसांकडे आतापर्यंत किमान १०० हून अधिक जणांच्या तक्रारी आल्या असून त्याची रक्कम ६५ लाख रुपयांवर गेली आहे.