नायफडचा बंधारा फुटल्याने शेकडो एकर शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:43+5:302021-08-01T04:09:43+5:30
नायफड येथील हे धरण आर्ट ऑफ लिविंग या स्वयंसेवी संस्थेने बांधले असून, हे धरण मुळातच वळणावर धरण बांधले ...
नायफड येथील हे धरण आर्ट ऑफ लिविंग या स्वयंसेवी संस्थेने बांधले असून, हे धरण मुळातच वळणावर धरण बांधले असून या पाचशे मीटर लांबी असलेल्या मातीच्या धरणाचे काम अवघ्या पाच ते सहा महिन्यांत पूर्ण करण्यात आले. या धरणाचे सांडवे चुकीच्या बाजूने उंचावर असल्याने पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे धरण मधोमध फुटले असल्याचे शेतकरी सांगताहेत. या ठेकेदारावर व संस्थेवर कारवाई करून वाहून गेलेल्या शेकडो एकर शेतजमिनीची नुकसान भरपाई मिळावी. या हंगामातील पंचवीस ते तीस लाख रुपयांचे भात उत्पन्नाचे नुकसान झाले आहे.
धरण फुटल्यानंतर नायफडप्रमाणेच उतारावर डेहणे येथील ओढ्याच्या परिसरातील ओळीने शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फुटले असून, जमीन वाहून गेल्याने पिकांचे नुकसान झालेच. परंतु शेतजमीन (बांधणी) दुरुस्त करणे शक्य नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या अचानक आलेल्या पुरामळे पुलांचे भराव वाहून गेले आहेत. डेहणे येथील दोन्ही पुलांचे मोठे नुकसान झाले आहे.
हे धरण बांधण्यात झालेल्या निष्काळजीपणामुळे ही वेळ आली आहे. वळणाची जागा, पूर्ण मातीचा, निकृष्ट दगडी पिचिंग व पाण्याचा दाब न पाहता काढलेला सांडवा यामुळे हे धरण फुटले. आमचे तीस शेतकरी जमीन गेल्याने रस्त्यावर आले आहेत. या शेतीवर अवलंबून असल्याने आमचा संसार संपला आहे. आम्हाला पैसे नको, आहे तशी शेती त्वरित दुरुस्त करून मिळावी. तसेच आताच्या भात शेतीचे उत्पन्न गेल्याने किमान पन्नास हजार रुपये शेतकरी खात्यावर जमा करावेत, अशी आमची शासनाकडे आर्जव आहे.
- दशरथ सोमा तिटकारे, शेतकरी व मा. सरपंच नायफड