गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला शेकडोंची बाईक रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:22+5:302021-05-17T04:10:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय दाखवत लॉकडाऊन सुरू असताना पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय दाखवत लॉकडाऊन सुरू असताना पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढली. यासंबंधीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर पुणेकरांना पकडणारे पोलीस रात्री उशिरा जागे झाले असून तब्बल १५० ते २०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊन असताना बिबवेवाडी पोलीस चौकीसमोरच मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दहा जणांच्या टोळक्याने माधव हनुमंत वाघाटे या गुन्हेगाराचा निर्घृण खून केला होता. पोलीस चौकीसमोर एकाच वेळी इतके लोक जमतात, एका गुन्हेगाराला दुसरे टोळके मारते, तरीही पोलिसांना त्याचा लवकर पत्ता लागत नाही. या प्रकरणानंतरही पोलिसांना जाग आली नाही. बिबवेवाडी पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर माधव याचे पार्थिव धनकवडी येथील बालाजीनगरमध्ये नेले. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वाघाटे याच्या घरापासून अंत्ययात्रा काढली. त्यात मोठ्या संख्येने गुन्हेगार सहभागी होते. अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असताना येथे दुचाकीवर १५० ते २०० जण सहभागी झाले होते. यात अनेक जण मास्क न लावताच सहभागी झाले होते. याचा व्हिडिओ दुपारनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी हालचाल करुन गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ खाटपे, राजकुमार परदेशी, ऋषीकेश भगत, गणेश फाळके यांच्यासह २०० जणांवर रात्री ८ वाजता गुन्हा दाखल केला आहे.
खूनप्रकरणात चौघांना अटक
दरम्यान, माधव वाघाटे याच्या खूनप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गोपाळ ऊर्फ आबा गणेश ढावरे (वय ३०), सुनील भाऊसाहेब घाटे (वय २२), पवन सतीश गवळी (वय २५) आणि शुभम सचिन तनपुरे (वय २१, सर्व रा. बिबवेवाडी ओटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक हिवरकर अधिक तपास करीत आहेत.