गुटखा विकणाऱ्या शंभर जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:45+5:302021-03-13T04:21:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : अन्न आणि आौषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या चाळीस दिवसांत पुणे विभागातील १०६ पेढ्यांमधून ७० लाख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : अन्न आणि आौषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या चाळीस दिवसांत पुणे विभागातील १०६ पेढ्यांमधून ७० लाख ५३ हजार १८९ रुपयांचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला. गुटखाविक्री प्रकरणी १०७ जणांना अटक झाली आहे.
राज्यात गुटखा आणि पान मसाल्याचे उत्पादन, वाहतूक, वितरण, साठवणूक व विक्रीवर बंदी आहे. बंदीनंतरही गुटखा सर्वत्र सहज उपलब्ध होत असल्याचे वृत्त माध्यमांमधून सातत्याने प्रसिद्ध करण्यात येत आहे. लोकमतनेही या प्रकरणी पाहणी करून वृत्त दिले होते. माध्यमांमधील वृत्तांची दखल घेत पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली १ फेब्रुवारीपासून गुटखा विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे.
एफडीएने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील १०६ पेढ्यांवर कारवाई केली. यातील ९६ प्रकरणांमध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली असून, १०७ जणांना अटक करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील ३३ जणांना अटक झाली असून, ३२ दुकानांना टाळे ठोकले आहे. तर, सोलापुरातील ३४ जणांना अटक झाली असून, २३ दुकानांना टाळे ठोकले आहे. पुणे विभागात टाळे ठोकण्यात आलेल्या दुकानांची संख्या ८८ असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली.
गुटखा आणि पान मसाल्याची विक्री करणारे आणि दुकान मालकांविरोधात अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
--
गुटखा कारवाई
जिल्हा पेढी संख्या साठा रक्कम एफआयआर दाखल
पुणे ३८ ४४,२१,३०३ ३४
सातारा ११ ३,६५,६७१ ११
सांगली १० ११,१६,०७९ १०
कोल्हापूर १७ १,००,१८४ १६
सोलापूर ३० १०,४९,९५२ २५
एकूण १०६ ७०,५३,१८९ ९६