आयटी पार्क परिसरात शेकडो बांधकाम मजूर रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ; हिंजवडी पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 12:15 AM2020-04-29T00:15:32+5:302020-04-29T00:16:10+5:30

येथून जवळच असलेल्या एका मोठ्या बांधकाम प्रकल्पासाठी काम करणारे शेकडो परप्रांतीय मजूर आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर जमा झाले होते.

Hundreds of construction workers took to the streets in the IT Park area, causing chaos | आयटी पार्क परिसरात शेकडो बांधकाम मजूर रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ; हिंजवडी पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप 

आयटी पार्क परिसरात शेकडो बांधकाम मजूर रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ; हिंजवडी पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप 

Next

हिंजवडी : आयटीपार्क मधील माण हद्दीत असणाऱ्या एका खाजगी बांधकाम प्रकल्पावर काम करणारे शेकडो परप्रांतीय बांधकाम मजूर अचानक रस्त्यावर जमा झाल्याने एकच गोंधळ उडाला. हिंजवडी पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला. मंगळवार (दि.२८) रोजी सकाळी दहाच्या सुमारास हिंजवडी माण रस्त्यावरील बोडकेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. येथून जवळच असलेल्या एका मोठ्या बांधकाम प्रकल्पासाठी काम करणारे शेकडो परप्रांतीय मजूर आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर जमा झाले होते.

आम्हाला आमच्या मुळगावी जाऊद्या किंवा दर आठवड्याला आम्हाला वेळेवर खर्ची द्या तसेच उचल म्हणून दिलेले पैसे पगारातून कपात करु नये, कंपनी व्यवस्थापनाने पगार ठेकेदाराकडे न देता सरळ मजूरांना द्यावा अशा प्रमुख मागण्यांसाठी पाचशेहून अधिक मजूर एकत्र जमा झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक करण्यात आलेले लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे शेकडो बांधकाम मजूर आयटीपार्क परिसरात अडकून पडले आहेत. अनेक ठिकाणी संबंधीत प्रकल्प व्यवस्थापनाने मजूरांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे,  अन्नधान्य तसेच किराणामालाची सोय सुद्धा केली आहे. मात्र ठेकेदाराकडून आठवड्याला खर्ची मिळत नसल्याने कुटुंबीयांना पैसे पाठवता येत नाही.

तसेच उचल म्हणून दिलेले पैसे नंतर पगारातून कपात करतील अशी भिती वाटत असल्याने आणि  सध्या सुरू असलेला लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढण्याची भीती अनेक मजूरांना वाटत असल्याने  शासनाने आम्हाला मुळगावी जाण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी शेकडो बांधकाम मजूर जमावबंदी झुगारुन एकत्र आले होते. 

जमावबंदीचा उडाला फज्जा 

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावबंदी करण्यात आली आहे. आयटीनगरी परिसरातील ग्रामस्थांना सुद्धा विनाकारण गावाबाहेर न पडण्याचे आवाहन पोलीसांकडून  करण्यात आले आहे. मात्र आयटीपार्क मधील मुख्य रस्त्यावर शेकडो परप्रांतीय बांधकाम मजूर अचानक एकत्र जमा झाल्याने 
जमावबंदीचा फज्जा उडाला तसेच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने मजूरांची वेळीच समजूत काढली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. 

---------------------

मुळगावी जायचे आहे तसेच इतर काही मागण्यांसाठी काही बांधकाम मजूर एकत्र जमा झाले होते. माहिती समजाताच तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांची समजूत काढली आणि त्यांना पुन्हा आपल्या लेबर कँम्प मध्ये पाठवले आहे. 
- यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी. 

Web Title: Hundreds of construction workers took to the streets in the IT Park area, causing chaos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.