लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेकडे शेकडो मागणीपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 AM2021-04-20T04:12:32+5:302021-04-20T04:12:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसह अनेक शाळांमध्ये तथा खासगी रुग्णालयांतही आजमितीला १७० लसीकरण केंद्रे कार्यरत ...

Hundreds of demands to the Municipal Corporation to start a vaccination center | लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेकडे शेकडो मागणीपत्रे

लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेकडे शेकडो मागणीपत्रे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसह अनेक शाळांमध्ये तथा खासगी रुग्णालयांतही आजमितीला १७० लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत़ तरीही अनेक माननीयांसह, सामाजिक संस्था, राजकीय नेते यांच्याकडून आमच्या भागात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी सातत्याने होत आहे़ अशी शेकडो मागणीपत्रे महापालिकेकडे प्राप्त झाली आहेत़ मात्र आरोग्य विभागाकडील उपलब्ध डॉक्टर, नर्सच्या संख्येनुसार व त्या भागात खरोखरच केंद्राची आवश्यकता आहे का ? याचा क्षेत्रीय कार्यालयाचा अहवाल आल्यावरच आरोग्य विभागाकडून परवानगी देण्यात येत आहे़

पुणे महापालिकेकडे शहरातील प्रत्येक भागातून लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत शेकडो पत्रे प्राप्त झाली आहेत़ त्या अनुषंगाने महापालिकेने आत्तापर्यंत मोफत लसीकरण केंद्रांची संख्या वाढवलीही़ परंतु, प्रत्येक जण आपापल्या भागात अधिकचे लसीकरण केंद्र असावे असा आग्रह धरत आहे़ यामुळे संबंधित भागाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत प्रत्यक्ष जागेची पाहणी करणे, महापालिकेच्या शाळेजवळ ते केंद्र आहे का, त्या जागेच्या आसपास किती अंतरावर दुसरे केंद्र आहे का आदींची सहानिशा प्रथमत: केली जात आहे़ तसेच तेथे खरोखर लसीकरण केंद्र उभारणे जरूरी आहे का याची पाहणी क्षेत्रीय कार्यालय प्रमुखांकडून प्रथम पाहणी केली जात आहे़ त्यांचा सकारात्मक अहवाल आल्यास व क्षेत्रीय कार्यालय त्या ठिकाणी मंडपासह सर्व आवश्यक सुविधा देईल असा अभिप्राय आल्यावरच संबंधित मागणी मान्य करण्यात येत आहे़

-------------------------

आजपर्यंत सात लाख लसीकरण

पुणे महापालिकेच्यावतीने शहरातील १७० लसीकरण केंद्रांना नित्याने उपलब्ध असलेल्या लस पुरविण्यात येत आहेत़ आज महापालिकेच्या मोफत लसीकरण केंद्रांची संख्या १०० वर गेली आहे. आजपर्यंत शहरात या सर्व व खासगी लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून ६ लाख ९१ हजार ९२७ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली असून, १९ एप्रिल रोजी म्हणजे आज दिवसभरात १९ हजार ६७५ जणांना लस दिली गेली आहे़

-------------------------

डॉक्टर्स व नर्स यांच्या उपलब्धेनंतरच केंद्राला मान्यता

लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत आरोग्य विभागाकडे अनेकांकडून मागणी होत आहे़ परंतु, संबंधित जागी त्या-त्या क्षेत्रिय कार्यालयाकडूनच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत़ त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष पाहणी अहवाल व अभिप्रायानंतरच, आरोग्य विभागाकडील डॉक्टर्स व नर्स यांच्या उपलब्धेनुसार संबंधित लसीकरण केंद्रास अंतिम मान्यता दिली जात आहे़

डॉ़ वैशाली जाधव ,

सहायक आरोग्य प्रमुख तथा लसीकरण अधिकारी पुणे महापालिका

--------------------------------

Web Title: Hundreds of demands to the Municipal Corporation to start a vaccination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.