वादळी पावसामुळे शेकडो पक्ष्यांवर विघ्न; अनेक पिल्लं मृत तर काही जखमी
By श्रीकिशन काळे | Published: May 24, 2024 12:06 PM2024-05-24T12:06:26+5:302024-05-24T12:06:38+5:30
जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात येत असून काहींची तब्येत अत्यंत चिंताजनक
पुणे : जोरदार वारे व वादळी पावसामुळे गुरूवारी रात्री बारामती जवळील सोमेश्वर गावातील एक मोठे झाड कोसळले. त्यावरील शेकडो घरट्यांतील पक्ष्यांची पिल्लेही जखमी झाली आणि काही मृत झाली. जखमी पक्ष्यांवर रेस्क्यू टीमकडून उपचार करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बारामती, इंदापूर व पुण्यातही वादळी वारे आणि जोरदार पाऊस होत आहे. त्यामध्ये मोठमोठी झाडे उन्मळून पडत आहेत. त्यावरील पक्ष्यांची घरेही नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी बारामती परिसरात सायंकाळी वादळी पाऊस झाला आणि त्यामुळे सोमेश्वर गावातील एक मोठे झाड उन्मळून पडले. त्या झाडावर दीडशेहून अधिक पक्षी राहत होते. मोठे झाड असल्याने पक्ष्यांची घरटी भरपूर होती. झाड कोसळून त्यावरील घरटी जमिनीवर आणि काही पाण्यात पडली. त्यामुळे अनेक पिल्लं मृत पावली. तर काही जखमी झाली आहेत. याची माहिती रेस्क्यू टीमला समजली आणि त्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांना दीडशे पक्षी आढळून आले. त्यातील काही मृत होती तर काही जखमी होती. जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात येत आहेत, काहींची तब्येत अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती रेस्क्यू ट्रस्टच्या संस्थापक नेहा पंचमिया यांनी दिली. पक्षी रात्रीचा आसरा झाडांवर घेतात. त्यामुळे शेकडो पक्षी या झाडावर बसलेले असणार आणि रात्री वादळी पावसाने ते झाड कोसळले असणार. त्यामुळे पक्षी यामध्ये सापडून मृत व जखमी झाले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.