पवनेत आढळले शेकडो मृत मासे;‘लोकमत’मुळे नदी फेसाळल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:20 IST2024-12-20T11:18:49+5:302024-12-20T11:20:36+5:30
पर्यावरण विभागाच्या पथकाकडून पाहणी, पर्यावरणवादी संस्था संतप्त

पवनेत आढळले शेकडो मृत मासे;‘लोकमत’मुळे नदी फेसाळल्याचे उघड
पिंपरी : पवना नदीत येणारा फेस हा साबणाच्या पाण्याचा, डिटर्जंटचा असावा? असा अंदाज महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळाने लावला आहे. नदी फेसाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरूवारी शेकडो मासे मृत आढळून आले. ‘साबणाच्या पाण्याने मासे मरतात का?’ असा प्रश्न पर्यावरणवादी संस्थांनी विचारला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदी गेल्या काही महिन्यांपासून वारंवार फेसाळत आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर केजुदेवी बंधाऱ्यावरून पाणी पडल्यामुळे पाण्याला फेस येतो, हा फेस रसायनयुक्त पाण्याचा नसून साबण किंवा डिटर्जंटचा आहे, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने आजवर केलेल्या तपासण्यांमध्ये आढळून आले आहे.
‘लोकमत’मुळे नदी फेसाळल्याचे उघड
दोन दिवसांपूर्वी थेरगाव केजुदेवी येथील बंधाऱ्यापासून चिंचवडपर्यंत नदी फेसाळली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने तातडीने पाण्याचे नमुने घेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल येण्यास अजून तीन ते चार दिवस लागणार आहेत.
शहराबाहेरून दूषित पाणी
शहराच्या किवळे-रावेत इथपासून ते चिंचवडपर्यंतच्या पात्रामध्ये मृत मासे आढळले आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने नदीची पाहणी केली. त्यामध्ये शहराबाहेरून पीएमआरडीए हद्दीतून आलेल्या दूषित पाण्यामुळे मासे मृत पावले आहेत, असा अंदाज व्यक्त केला आहे.
पवना नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पवना नदी ज्या भागातून वाहते, त्या भागातील ग्रामपंचायती, पीएमआरडीएच्या भागातून मोठ्या प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाते. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने साबणाच्या पाण्यामुळे फेस येत आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. साबणाच्या पाण्यामुळे मासे मरू शकतात का? असा प्रश्न पडला आहे. - नीलेश पिंगळे, थेरगाव सोशल फाउंडेशन
पवना नदीत मृत मासे आढळले आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर पर्यावरण विभागाच्या पथकाने पाहणी केली. महापालिका हद्दीबाहेरील नदीपात्रातून पाणी वाढले. हद्दीबाहेरून दूषित पाणी आल्याने मासे मृत झाले असावेत. आपल्या हद्दीत कोठेही रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात नाही, याची खात्री केली आहे. - संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग