तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ ; फडांना पॅकेज द्या : डॉ. अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 05:21 PM2020-03-19T17:21:29+5:302020-03-19T17:22:44+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांच्या यात्रा रद्द
खोडद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील अनेक यात्रा रद्द झाल्या आहेत. पर्यायाने यात्रेनिमित्त आयोजित तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले. तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंतांवर आलेली उपासमारीची वेळ थांबविण्यासाठी तमाशा फडमालक व तमाशा कलावंतांना सांस्कृतिक मंत्र्यांनी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत शून्य प्रहरातील चर्चेत केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. पर्यायाने या गावांमध्ये आयोजिलेले लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले आहेत. कोरोनामुळे तमाशाच्या बुकिंगवर परिणाम तर झालाच, पण झालेल्या बुकिंग, सुपाऱ्यादेखील मोठ्या प्रमाणात रद्द झाल्या आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातदेखील खासदार डॉ. कोल्हे यांनी तमासगिरांची व्यथा मांडली असून, राज्यशासनाने तमाशा कलावंतांसह फडमालकांनाही विशेष अनुदान पॅकेज द्यावे, अशी मागणी केली आहे.
तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. तमाशा कलावंतांनी आजपर्यंत अवघ्या महाराष्ट्रात जनजागृतीसोबतच करून समाजभानदेखील निर्माण केले आहे. यात्रेच्या काळात तमाशा कलावंत गावोगावी जाऊन नागरिकांचे मनोरंजन करून जनजागृती करून समाजप्रबोधन करतात. कोरोनामुळे अनेक यात्रा रद्द झाल्या आहेत. यामुळे अनके तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले आहेत. यामुळे तमाशातील कलावंत व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सांस्कृतिकमंत्र्यांनी तमाशा फडमालक व कलावंतांसाठी पॅकेज जाहीर करावे आणि तमाशा फडमालक व कलावंतांबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने पॅकेज द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी संसदेत केली.
संपूर्ण महाराष्ट्रात हंगामी आणि कायमस्वरूपी असणारे सुमारे ३८५ तमाशा फड आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे गावोगावच्या रद्द होत असलेल्या यात्रांमुळे तंबूच्या प्रत्येक तमाशा फडाचं सुमारे ७५ ते ८० लाख रुपयांचं नुकसान झालं आहे, तर प्रत्येक छोट्या तमाशा फडाचं सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व तमाशा फडांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.
..............
मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले निवेदन
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन तमाशा कलावंतांना विशेष अनुदान पॅकेज देण्याची मागणी केली. शिवकाळापासून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकऱ्यांचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणारी लोककला म्हणून तमाशा आणि लोकनाट्य प्रसिद्ध आहे. याचे संवर्धन करण्यासाठी राज्यशासनही सर्वतोपरी प्रयत्न करीत असते; पण मागील तीन वर्षे सतत नुकसानीत गेल्याने ही लोककला जगविण्यासाठी सरकारने तमाशा फडांना व कलावंतांना विशेष अनुदान पॅकेज द्यावे, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी या निवेदनात केली आहे.
............