भीमाशंकर परिसरातील व्यावसायिकांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:14 AM2021-08-25T04:14:36+5:302021-08-25T04:14:36+5:30
श्री क्षेत्र भीमाशंकरला देशाच्या कानाकोपऱ्यातून वर्षभर हजारो भाविक व पर्यटक येत असतात. विशेषत: महाशिवरात्र व श्रावण महिन्यात गर्दी वाढत ...
श्री क्षेत्र भीमाशंकरला देशाच्या कानाकोपऱ्यातून वर्षभर हजारो भाविक व पर्यटक येत असतात. विशेषत: महाशिवरात्र व श्रावण महिन्यात गर्दी वाढत असते. या भाविक व पर्यटकांवर येथील सुमारे १८० व्यावसायिकांची उपजीविका अवलंबून आहे. यामध्ये हॉटेल, लॉजिंग, देवाचे बेलफूल नारळ, प्रसिद्ध कंदी पेढे, कटलरी, वनऔषध, पावसाळ्यात प्लॅस्टिक कागद, रानमेवा, रानभाज्या असे व्यवसाय चालतात. परंतु मंदिर बंद असल्यामुळे या व्यवसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर हे धार्मिकस्थळ असल्याने येथे हार, फुले, नारळ, पुजेचे साहित्य, खेळणी, मिठाई, फोटो फ्रेम, सीडी, हॉटेलसह इतर व्यवसाय जोरात असतात. परंतु कोरोना संकटामुळे मागील काही महिन्यांपासून ही दुकाने बंद असल्याने व्यावसायिक संकटात सापडला आहे. तालुक्यात श्री क्षेत्र भीमाशंकर बरोबरच गुप्त भीमाशंकर, हनुमान तळे, राम मंदिर आदी धार्मिक स्थळी तसेच कोंढवळ धबधबा, नागफणी, मुंबई पॉईंट, भीमाशंकर अभयारण्य भटकंती इत्यादी पर्यटनस्थळे नागरिकांची वर्दळ असते. कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर नागरिकांना देवदर्शन, पर्यटनस्थळी जाण्यास बंदी असल्यामुळे सर्व धार्मिक व पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. त्यामुळे शासनाने या व्यवसायिकांचा विचार करावा, अशी मागणी दत्तात्रय हिले, आदिवासी नेते मारुती लोहकरे अशोक लोहकरे, मनोज शेंगाळे यांनी केली आहे.
--
कोट
शासनाने सध्या हॉटेल चालकांना काही नियमांसहित व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. मात्र मंदिरे बंद असल्यामुळे या ठिकाणी ग्राहकच फिरकत नसल्याने मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारी ही बंद असल्याने येथील व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने स्थानिक व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी किंवा मग मंदिर व पर्यटन खुले करावे.
- नामदेव कोळप
भीमाशंकर टपरी संघटनेचे अध्यक्ष
--
फोटो क्रमांक : २४ बारा ज्योर्तिलिंग व्यावसायिक
फोटो ओळी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे.