शेकोट्यांबरोबरच खेड तालुक्यात रंगू लागल्या हुरडा पार्ट्या; वाढत्या थंडीचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:11 PM2018-01-04T13:11:21+5:302018-01-04T13:13:54+5:30
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात थंडीचा पारा वाढल्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्यांबरोबरच हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. सकाळी व संध्याकाळी दवबिंदूचे चहूकडे सडे पडत आहेत.
चासकमान : सध्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागात थंडीचा पारा वाढल्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्यांबरोबरच हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत.
कडूस, चासकमान परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात थंडी पडत असल्यामुळे संध्याकाळच्या प्रहरी व सकाळच्या प्रहरी गावागावांमध्ये शेकोट्या पेटू लागल्या आहेत. दुपारच्या प्रहरी कोवळे ऊन पडत आहे. ग्रामीण भागात हुडहुडीने तरुण व आबालवृद्ध नागरिक थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवू लागला आहे.
तसेच ग्रामीण भागातील नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी कपड्यांच्या दुकानात स्वेटर, जर्कीन, कानटोपी, हातमौजे खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागला आहे.
तसेच परिसरात शेतकरी हरभरा, मका, ज्वारी आदी पिके शेतकरी घेत असल्याने परिसरात हुरडा पार्टी, शेकोट्यावर भाजलेला हरभरा, उकडलेला मका आदींना शहरी, तसेच निमशहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात येऊन पार्टी करू लागला आहे. यामुळे ग्रामीण भागातील हुरड्याला दिवसेंदिवस मागणी वाढू लागल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा रोजगार निर्माण झाला असल्याचे शुभम गुरव, विशाल भोर, संदीप नेहेरे, विशाल जावळे, अक्षय मोढवे, प्रदीप पांगारे, नंदू मुसळे, अतुल मोढवे आदी शेतकऱ्यांनी सांगितले.
थंडीमध्ये वाढ झाली असल्यामुळे ज्वारीपिकांमध्ये वाढ होऊन टपोरे दाणे भरण्यास सुरुवात झाली असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक ऐन थंडीमध्ये हुरडा पार्टी करू लागला आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असल्याने शेतकºयांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने परिसरात थंडी सतत पडत असते. सकाळी व संध्याकाळी दवबिंदूचे चहूकडे सडे पडत आहेत.