महामार्ग रुंदीकरणातील अडथळे हटविले
By admin | Published: February 27, 2016 04:26 AM2016-02-27T04:26:46+5:302016-02-27T04:26:46+5:30
पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर येथील बाग (ता. हवेली) येथील रस्तारुंदीकरणात येणाऱ्या अडथळ्यांवर आजही (दि. २६) कारवाई सुरू ठेवण्यात आली. संपादित जागेत येणारी
नसरापूर : पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर येथील बाग (ता. हवेली) येथील रस्तारुंदीकरणात येणाऱ्या अडथळ्यांवर आजही (दि. २६) कारवाई सुरू ठेवण्यात आली. संपादित जागेत येणारी अतिक्रमणे हटविण्यात आली असून, ही कारवाई सुरू राहणार आहे. आज सायंकाळी साडेसातपर्यंत कारवाई सुरू होती. महसूल विभागाच्या वतीने दि. २४ पासून मोहीम सुरू आहे.
आजही संपादित जागेतील अतिक्रमणे प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांच्या उपस्थितीत हटविण्यात आली. या वेळी भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे यांच्यासह जलद कृती दलाची तुकडी तैनात ठेवण्यात आली होती. ३ जेसीबी, २ पोकलेन, ५ डंपर यांचा वापर करण्यात आला. सकाळपासून चालू असलेली कारवाई संध्याकाळी प्रांताधिकारी आल्यानंतरच वेगाने सुरू करण्यात आली. या वेळी स्थानिक नागरिकांनी अतिक्रमणाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. ‘आमचा या सरकारी कामाला विरोध नाही; मात्र हद्द निश्चिती करताना नेमकेपणा येऊन न्याय मिळत नाही,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रांताधिकारी बर्गे म्हणाल्या, की १३ वर्षांपूर्वी निवाडा झाल्याप्रमाणे जॉइंट मेजरमेंटप्रमाणे ही कारवाई आहे. त्यातल्या ९७ टक्के लोकांनी पेमेंट घेतलेले आहे. आम्ही जी अतिक्रमणे काढतोय, त्यातला एक इंचही असा नाही की, जो सरकारच्या मालकीचा नाही. सरकारने रीतसर संपादित केलेले आहे. त्याची भरपाई दिलेली आहे. (वार्ताहर)