विद्यापीठाला शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची घाई?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:43+5:302021-05-16T04:09:43+5:30
पुणे : कोरोनामुळे इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अद्याप द्वितीय सत्राच्या परीक्षा ...
पुणे : कोरोनामुळे इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अद्याप द्वितीय सत्राच्या परीक्षा घेतल्या नाहीत. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने येत्या १५ जूनपासून पदवी अभ्यासक्रमाचे पहिले सत्र सुरू होईल, असे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे विद्यापीठाला शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची घाई आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. बारावीच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केल्याशिवाय विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नाही. परंतु, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रथम द्वितीय व तृतीय सत्राचे शैक्षणिक वर्ष केव्हापासून सुरू होणार याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. तसेच प्रथम सत्राच्या परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाची परीक्षा दिलेली नसताना त्यांना द्वितीय वर्षात प्रवेश देऊन विद्यापीठ त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच विद्यापीठ प्रशासनाच्या चुकीमुळे प्रथम सत्राच्या परीक्षा तब्बल एक महिना उशिराने सुरू झाल्या. त्यामुळे द्वितीय सत्राच्या परीक्षा सुद्धा लाबंल्या. परिणामी या परीक्षा घेऊन पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास सप्टेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे.
---------------
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असले तरी सद्यस्थिती आणि परिपत्रकात प्रसिद्ध केलेल्या तारखा यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे द्वितीय सत्राच्या परीक्षा जून- जुलै महिन्यात घेतल्या जातील. या परीक्षांचे निकाल ऑगस्टमध्ये जाहीर केले जातील आणि प्रत्यक्षात नवीन सत्र सुरू करण्यास सप्टेंबर महिना उजाडेल.
-- एस. एम. राठोड, अध्यक्ष, पुटा