पुण्यात घरात घुसून पती - पत्नीला लुटले; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 02:52 PM2022-04-25T14:52:30+5:302022-04-25T14:53:34+5:30
महिलेच्या अंगावरील एक तोळा वजणाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उरूळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे
लोणी काळभोर : घरात वृद्ध पतीपत्नी दोघेच असताना संधी साधून पाच दरोडेखोरांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून पती पत्नीला लुटले आहे. महिलेच्या अंगावरील एक तोळा वजणाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उरूळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी बेबी महादेव कांचन (वय ५५, पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पाच अज्ञात चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन यांच्या सुनबाई तिच्या माहेरी गेल्या होत्या. त्यादिवशी मुलगा संध्याकाळी जेवण करण्यासाठी हॉटेलवर गेला असल्याने बेबी कांचन व पती हे दोघे घरात होते. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारांस दोघांनी जेवण केले. त्यानंतर घराला कडी लावून ते टीव्ही पाहत होते. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारांस कोणीतरी दरवाजा ठोठावला. तर अचानक दरवाजात चोरटे येउन उभे राहीले होते. त्यांनी चाकूचा धाक दाखवून बेबी यांच्या गळ्यातील आणि कानातील सोनं लगेच काढून दे. नायतर जीव घेईन. अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरुन त्यांनी गळ्यातील मंगळसुत्र आणि कानातले काढुन दिले. तरी त्याने चाकू त्यांच्याकडे रोखून धरला. बेबी यांनी हिम्मत करून चोरट्याच्या हातातील चाकू दोन्ही हातांनी पकडुन थोपविण्याचा प्रयत्न केला. झटापटीत त्यांचे दोन्ही हाताचे बोटांना चाकू कापल्याने गंभीर दुखापत झाली त्यामधुन रक्त येऊ लागले.
त्यांनी आरडाओरडा केला, त्यावेळी समोरच्या खोलीकडे पाहीले तर पति महादेव तुकाराम ( बळी ) कांचन यांच्या समोर दोनजण चाकूचा धाक दाखवुन घरातील कपाटाच्या किल्ल्यांची मागणी करीत होते. त्यावेळी बाहेर घराचे खिडकीजवळ आणखी एक माणूस उभा होता. बाहेरच्या माणसाने चला रे म्हणल्याने घरातील चौघे चोरटे घराबाहेर निघून गेले. जखमी बेबी यांना उपचारासाठी ऊरूळी कांचन येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या दोन्ही हाताला पंधरा टाके पडले आहेत. माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता त्यांना दरोडेखोरांनी स्वयंपाकघराचे खिडकीतून हात घालून खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडता आला नाही. तेव्हा बाहेर पडलेल्या काठीच्या सहाय्याने दरवाज्याची कडी उघडली व घरामध्ये प्रवेश केला. व दरोडा टाकून निघून गेले आहेत. परिसरातील अन्य एका ठिकाणी या दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला आहे.