नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 04:06 PM2021-06-17T16:06:31+5:302021-06-17T16:07:32+5:30
अधिवेशनात आरक्षणावर दोन दिवस चर्चा घेण्याची मागणी
एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही असं सूचक वक्तव्य भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. काल सेनाभवन समोर झालेल्या सेना भाजप कार्यकर्त्यांचा मारामारी बद्दल ते बोलत होते. दरम्यान देशविरोधी बोलणाऱ्याच्या सुरात तुम्ही का सूर मिसळता असा सवाल देखील त्यांनी सेनेला विचारला. तसेच विशेष अधिवेशन झालं नाही तर आत्ता होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तरी आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस राखून ठेवा अशी मागणी पाटील यांनी केली.
पुण्यात आज चंद्रकांत पाटील यांचा कडून वात्सल्य फाऊंडेशन चा माध्यमातून वंचित मुलींना नवीन ड्रेस चे वाटप करण्यात आले.त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
काल झालेल्या मारामारी बद्दल बोलताना पाटील म्हणाले , "आता निदर्शनं देखील करायची नाहीत का? परवानगी घेऊन २० जणांची निदर्शनं होती. पोलिसांनी त्यांना अटक पण केली. सेना भवनासमोर निदर्शनं केली.. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयासमोर सेनेने निदर्शनं केली. काँग्रेसने पण प्रयत्न केला."
राम मंदिर प्रश्नावर सेनेच्या भूमिकेवर देखील त्यांनी टीका केली."हिंदूंच्या विषयावर बोलायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. इथेच तर दुराव्याला सुरुवात झाली आहे. तुम्ही हिंदुत्व सोडलं. सर्वांनी सलोख्याने राम मंदिर बांधायला सुरुवात केली आहे. काँग्रेस ने आणि देशविरोधी ताकदीने जे करायचं ते चालवलेले आहेच. त्याला तुम्ही राष्ट्रीय म्हणता तर त्यांना सपोर्ट कसे करता?हे क्लेशदायक आहेच. एका खुर्ची पायी .. . "
दरम्यान ही महापालिका निवडणुकांची नांदी आहे का याबाबत बोलताना पाटील म्हणले ,"त्याग करणे हा स्थायीभाव आहे आपल्या संस्कृतीचा. पण खुर्ची पायी त्याग केला असं नाही तर सगळं सुरळीत चालावे म्हणून घेतलेला निर्णय होता.रोज उठून काही तरी देश विरोधी ताकदीने म्हणायचं आहे त्यात तुम्ही सुरात सुर कुठे मिसळता? "
सेना भाजप एकत्र येण्याचा शक्यता संपल्या आहेत का असं विचारल्यावर मात्र त्यांनी सूचक वक्तव्य केलं. पाटील म्हणाले ," एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही."
आरक्षणावर अधिवेशनात २ दिवस चर्चेची मागणी
पावसाळी अधिवेशनात आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. पाटील म्हणाले ,"जे जे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतील त्यांचा पाठीशी आम्ही आहोत.
विशेष अधिवेशन मागता मागता रूटीन अधिवेशन आलं. त्यात किमान २ दिवस आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला द्या.काय होतं २ तास चर्चा करता तेव्हा सगळ्यांना बोलता येत नाही. विशेष अधिवेशन असेल तर नीट सूचना देता येतात."
दरम्यान नव्या राजकीय गणितं जुळण्याचा शक्यातेवरून पाटील म्हणाले ," विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली की रणनीती ठरवू. पण बाकी मध्यावदी निवडणुका वगैरे सगळ्या पुड्या सोडल्या जातात.१८ महिन्यात १ दिवस ही असा नाही गेला की नवीन गणितं मांडली गेली नाहीत."