पतीकडून पत्नीवर प्राणघातक हल्ला
By Admin | Published: June 16, 2014 08:02 AM2014-06-16T08:02:42+5:302014-06-16T08:21:00+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार केल्याची घटना बुधवार पेठेमध्ये घडली.
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार केल्याची घटना बुधवार पेठेमध्ये घडली. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनिता भीमा ऊर्फ राजू खिलारे (वय २0, रा. प्रेमज्योत बिल्डिंग, बुधवार पेठ) असे जखमी महिलेचे नाव आहे. भीमा ऊर्फ राजू खिलारे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमा आणि अनिता हे मूळचे बुलढाण्याचे रहिवासी आहेत. ते मागील चार वर्षांपासून एकत्र राहत आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यापैकी एक ३ वर्षांचा आहे तर मुलगी ९ महिन्यांची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता ही बुधवार पेठेमध्ये काम करते. खोली भाड्याने घेऊन ते एकत्र राहत होते. गेल्या काही दिवसांपासून भीमा हा अनिताच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. शेजारी राहणार्या तरुणाबरोबर तिचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता.
शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घरी आलेल्या भीमाने अनिताला आवाज देऊन बाहेर बोलावले. अर्जंट बोलायचे असे सांगून अनिताचा गळा पकडून चाकूने गळ्यावर, हातावर, दंडावर व पायावर वार करून खुनाचा प्रयत्न केला. तिला रक्ताच्या थारोळ्यात टाकून भीमा पसार झाला. पुढील तपास उपनिरीक्षक व्ही.एम. कोळी करीत आहेत. (प्रतिनिधी)