दीप्ती काळेच्या अटकेवरुन निवृत्त लेफ्टनंट कमांडर पतीने केली होती थेट परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 08:48 PM2021-04-27T20:48:02+5:302021-04-27T20:52:29+5:30
जीवाला धोका असल्याची व्यक्त केली होती भीती
पुणे : अॅड. दीप्ती काळे यांना पोलिसांनी मध्यरात्रीनंतर घरी जाऊन अटक केल्याप्रकरणी त्यांचे पती लेफ्टनंट कमांडर श्रीवास्तन रामाणी (निवृत्त) यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी दीप्ती काळे यांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती.
आजच मोक्का कारवाई झालेल्या दीप्ती काळे हिचा ससून रुग्णालयातील ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यु झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली. मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात दीप्ती काळे हिला पोलिसांनीअटक केली होती.
काळे यांचे पती रामाणी हे कॅनेडियन नागरिक असून सध्या ते मोठ्या मुलाकडे कॅनडा येथे वास्तव्याला आहेत. रामाणी हे इंडियन नेव्हीमध्ये लेफ्टनंट कमांडर होते. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांना पाठविलेल्या पत्रात रामाणी यांनी आपली पत्नी दीप्ती काळे ही लहान मुलासह पुण्याला राहत आहे.
यापूर्वी दीप्ती काळे हिच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आपण पुणे पोलीस आयुक्तांची २०१९ मध्ये भेट घेऊन पुरावे दिले होते. पोलिसांनी आता तिला अटक केली आहे. पोलीस कोठडी दरम्यान तिच्या जीवाला धोका आहे. आपले कोणी नातेवाईक या प्रसंगी पुण्यात नाही. सध्याच्या कोविडच्या काळात चेन्नईहून नातेवाईकांना पुण्यात येणे अशक्य आहे. माझ्याकडे काही पर्याय नसल्याने आपल्याशी पत्रव्यवहार करत असल्याचे रामाणी यांनी या पत्रात म्हटले आहे. याबाबतची माहिती अॅड. तौसिफ शेख यांनी दिली.
दरम्यान, अॅड. दीप्ती काळे ही पोलीस संरक्षणात असल्याने तिच्या मृत्युची नियमानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाईल.