फ्लॅट हडपण्यासाठी पत्नीकडून पतीचा छळ, अनेकदा केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 03:19 PM2018-04-18T15:19:25+5:302018-04-18T15:19:25+5:30
लवकर लग्न करावे म्हणून प्रमिलाने प्रविणला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे अगदी १२ दिवसांत त्यांचा विवाह झाला.
पुणे : सुमारे ६० लाख रुपये किंमतीचा फ्लॅट हडपण्यासाठी पत्नीने पतीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फ्लॅटचा ताबा देण्यासाठी तिने पतीला वेळोवेळी मारहाण केली आहे. पत्नीकडून होत असलेल्या या आत्याचाराचे पतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असून घटस्फोट मिळावा यासाठी त्यांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आहे. प्रविण आणि प्रमिला असे या दांम्पत्याचे नाव. दोघेही उच्च शिक्षित आणि आयटीत कंपनीत काम करतात. दोघांनाही चांगल्या पगाराची नोकरी आहे. प्रविण हा मुळचा बीडचा तर प्रमिला (नावे बदलली )नाशिकचे राहणारे आहे.
सध्या ते वाकड येथे राहत आहेत. प्रेमविवाह झालेल्या या दाम्पत्यात सुरुवातीपासूनच वाद होत होता. मात्र, आता पत्नीने अत्याचाराची सीमा गाठल्याने प्रविण यांच्यावतीने अॅड. पुष्कर पाटील आणि अॅड. विवेक शिंदे यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. प्रविण आणि प्रमिला यांची २०१० साली ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात होवून त्यांनी नोव्हेंबर २०१६ साली लग्न केले. लवकर लग्न करावे म्हणून प्रमिलाने प्रविणला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे अगदी १२ दिवसांत त्यांचा विवाह झाला. लग्न झाल्यानंतर दहा दिवस होत नाही तोच त्यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. घर घ्या आणि ते माझ्या नावावर असावे, असा हट्ट तिने धरला. त्यानुसार त्यांनी वाकड येथे सुमारे ६० लाख रुपये किंमतीचा फ्लॅट घेतला. कागदोपत्री प्रमिला ही त्या फ्लॅटची पहिली मालकीण आहे. परंतु, फ्लॅटसाठी लागणारी टोकन रक्कम व होम लोन प्रविण यांनी काढले, असे प्रविण यांनी दिलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.
.........................
सासु सास-याला शिवीगाळ, दिरावर अश्लील आरोप
मुलाचा संसार पाहण्यासाठी प्रविणचे आईवडील एक दिवस त्यांच्या घरी आले. मात्र, सासू-सासरे घरी आल्याची अडचण झाल्याने प्रमिला हिने त्यांना तुम्ही गावठी आहात, तुम्ही नालायक असून पुन्हा आमच्या घरात येऊ नका, अशी धमकी दिली. तसेच तिने प्रविणच्या भावावर देखील नको ते आरोप केल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच हा प्रकार प्रविण यांनी प्रमिलाच्या घरी सांगितला असता तुझ्या कुटुंबावर केस दाखल करू अशी त्यांना मिळाली. त्यामुळे तु आता घरातून निघून जा हे घर मला पाहिजे. त्याव्यतिरिक्त तू २ कोटी ५० लाख रुपये द्यावे, अशी मागणी प्रमिलाने केली आहे.
...................
पत्नीच्या कारनाम्यांचे छुप्या कॅमे-याद्वारे व्हिडीओ शुटिंग
पत्नीच्या कारनाम्यांचे छुप्या कॅमे-याद्वारे व्हिडीओ शुटिंग प्रविण यांनी करुन ठेवले आहे. त्यात तिच्याकडून होत असलेला अत्याचार कैद झाला आहे. अनेकदा तिने प्रविणला मारहाण केल्याचे देखील त्यात चित्रित झाले आहे. पती व्हिडीओ शुटींग करतो म्हणून प्रमिलाने त्याचे दोन मोबाईल देखील फोडले. तर माझा मृत्यू झाला तर त्यास पती प्रविण याला जबाबदार धरण्यात यावे, असा व्हिडिओ प्रमिला हिने तयार केल्याची माहिती अॅड. पवार यांनी दिली. क्षुल्लक कारणांवरून पत्नीकडून होत असलेल्या छळाबाबत प्रविण हे वाकड पोलीस स्टेशनध्ये तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र त्यांची कोणत्या कलमाखाली तक्रार घेण्याची असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कौंटुबिक न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. हा प्रकार प्रविण यांनी प्रमिलाच्या घरी सांगितला असता तुझ्या कुटुंबावर केस दाखल करू अशी धमकी दिली. त्यामुळे तु आता घरातून निघून जा हे घर मला पाहिजे. त्याव्यतिरिक्त तू २ कोटी ५० लाख रुपये द्यावे, अशी मागणी प्रमिलाने केली आहे.