Pune: घरगुती वादात पतीने कात्रीने वार करून पत्नीला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:26 IST2025-01-22T16:25:51+5:302025-01-22T16:26:51+5:30
नवरा बायकोमध्ये घरगुती कारणावरून वारंवार भांडणे होते होती

Pune: घरगुती वादात पतीने कात्रीने वार करून पत्नीला संपवले
पुणे: घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या नवऱ्याने बायकोच्या गळ्यावर कात्रीने वार करून खून केला. ज्योती शिवदास गीते (वय २८, रा. लेन नं. ५, तुळजाभवानी नगर, खराडी) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.
याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदास गीते हा मूळ बीडचा रहिवासी आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो. तुळजाभवानी नगर येथे तो भाड्याने राहत आहे. गीते नवरा-बायकोत घरगुती कारणावरून भांडणे होत होती. बुधवारी पहाटे देखील याच कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात आरोपी शिवदास याने घरातील कात्रीने ज्योती हिच्या गळ्यावर वार करुन खून केला. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपी शिवदास गीते याला ताब्यात घेत अटक केली. तसेच ज्योती हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.