लॉकडाऊनमध्ये कामावर राहत असल्याचे सांगत केला दुसरा घरोबा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 03:22 PM2021-11-16T15:22:42+5:302021-11-16T15:27:32+5:30
आपल्या पत्नीला लॉकडाऊनच्या काळात घरी न येता कामाचे ठिकाणी राहत असल्याचे सांगितले. त्या कालावधीत त्याने एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले...
पुणे : लॉकडाऊनच्या काळात अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. अनेकांची ताटातुट झाली होती. पती एका गावात तर पत्नी, मुले दुसऱ्या गावात अशी अनेक कुटुंबाची स्थिती झाली होती. मात्र, या लॉकडाऊनचा एका पतीराजाने चांगलाच गैरफायदा घेतला. कामावर राहतो, असे सांगून त्याने चक्क दुसर्या महिलेबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी रामवाडी येथील एका ३७ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती अभिजित जाधव याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित जाधव हा त्याच्या पत्नीला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन शारीरीक छळ करीत होता.
जाधव याने आपल्या पत्नीला लॉकडाऊनच्या काळात घरी न येता कामाचे ठिकाणी राहत असल्याचे सांगितले. त्या कालावधीत त्याने एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले. या महिलेस व तिच्या दोन मुलांना बेकायदेशीरपणे घरात आणले. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. रविवारी जबरदस्तीने घरातून बाहेर काढून हकलून दिले. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.