पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:13 AM2021-04-23T04:13:05+5:302021-04-23T04:13:05+5:30
बारामती : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. महेंद्र महादेव भापकर असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे ...
बारामती : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. महेंद्र महादेव भापकर असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. बारामतीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांनी गुरुवारी ही शिक्षा सुनावली. कारखेल गावात २०१५ मध्ये घटना घडली होती.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी होती, कारखेल गावी चेअरमन वस्ती येथे महेंद्र महादेव भापकर हे पत्नी सोनाली सोबत राहत होते. त्यांच्यात ती गरोदर असताना वाद झाल्याने ती बरेच दिवस माहेरी राहत होती. पतीने कौटुंबिक संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी दावा ही केला .त्यानंतर तिला मुलगा झाल्यानंतर त्यांच्यात तडजोडनामा झाला .त्यानुसार सासरच्या इतर नातेवाईकांपासून पती पत्नी वेगळे राहण्याचा निर्णय झाला होता.
मुळची तिखी ता. कर्जत जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असलेली सोनाली हिचा विवाह २०१२ साली झाला होता. २०१४ साली तिच्या वडलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या आजारपणात खर्च केल्याने त्यांचे थोरले जावई यांना सुमो जिप दिली .सदर जिप मला दिली नाही ,हुंडा आणला नाही व जमिनीत हिस्सा देत नाही या कारणावरुन पत्नी सोनालीचा छळ होत होता, अशी तक्रार तिच्या चुलत काकांनी वडगाव निंबाळकर येथे दिली. त्यांना खुनाच्या दिवशी राजहंस भापकर नावाच्या व्यक्तीने तुमच्या पुतणीच्या घरावर दरोडा पडला असून तिच्या कानावर, तोंडावर वार झाले आहेत, तरी त्वरित या असा फोन केला. कारखेल येथे आल्यावर तिला भोसकल्याचे व अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्याचे पाहून ती मृत झाल्याने तिची उत्तरीय तपासणी करणेत आली. सासरच्या लोकांच्या छळाची व त्यांच्यावर संशय असल्याची तक्रार तेचे चुलत काका पांडुरंग पवार यांनी वडगाव निंबाळकर येथे दिली. पोलीसांनी तपास करुन सासरच्या लोकांवर कौटुंबिक हिंसाचार व खुनाचा गुन्हा दाखल केला.
सुनावणी दरम्यान सरकार पक्षाच्या वतीने अॅड. संदीप ओहोळ यानी ९ साक्षीदार तपासले फिर्यादीसह मयत सोनालीची आई, पंचनाम्यातील पंच तपास अधिकारी गजानन गजभारे यांचेसह डॉक्टर दिलीप झेंडे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारपक्षातर्फे परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध करताना आवश्यक बाबीबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक खटल्यांचे दाखले देण्यात आले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने महेंद्र यास दोषी ठरवत खुनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
—————————————————
बचाव पक्षाचे वकील अॅड. विजयराव मोरे यानी पोलीसानी खोटा पंचनामा तयार केला असल्याचा बचाव करीत कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा शाबीत होत नाही. पत्नीने त्याबाबत अगोदर कुठेच तक्रार दाखल केली नव्हती,असा बचाव केला .त्यावरुन पतीसह सासरच्या ईतर नातेवाईकांची कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
—————————————————
मुलाला मदत करण्याचे आदेश ..
आईचा खून झाला, वडिलांना शिक्षा झाली त्यामुळे लहान मुलगा शौर्य याला जिल्हा विधी सेवा समितीद्वारे नुकसानभरपाई, मदत देण्याचे आदेश देखील जिल्हा न्यायाधीश आर. आर. राठी यानी दिले आहेत .
————————————————