Pune Crime: कौटुंबिक वादातून पतीने गळा दाबून केला पत्नीचा खून, पुणे शहरातील घटना
By नितीश गोवंडे | Published: September 6, 2023 03:49 PM2023-09-06T15:49:07+5:302023-09-06T15:49:41+5:30
यातील मुख्य बाब म्हणजे बाप जेव्हा आईला मारत होता त्यावेळी त्यांची तीन चिमुकली मुले देखील समोर होती...
पुणे : कामानिमित्त उत्तरप्रदेश येथून कुटुंबासमवेत राहण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील पतीने कौटुंबिक वादातून त्याच्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. नूरजहाँ मोहम्मद शफीक चौधरी (२८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. यातील मुख्य बाब म्हणजे बाप जेव्हा आईला मारत होता त्यावेळी त्यांची तीन चिमुकली मुले देखील समोर होती, मात्र बापाचा पारा एवढा चढला होता की, त्याला याचेही भान नव्हते.
या प्रकरणी पोलिसांनी नुरजहाँ यांचा पती मोहम्मद शफीर सुकीरल्ला चौधरी (३४) याला अटक केली असून, याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद चौधरी हा चार वर्षांपूर्वी कामानिमित्त उत्तरप्रदेश येथून शहरात वास्तव्यास आला होता. भवानी पेठेतील अनंत कोऑपरेटिव्ह सोसायटीतील मंजुळा चाळ या ठिकाणी तो परिवारासह राहत होता. चौधरीचा टेलरिंगचा व्यवसाय होता.
नुरजहाँ आणि मोहम्मद यांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक वर्षांची तीन मुले आहेत. लग्न झाल्यापासून या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणावरून वादविवाद व्हायचे. पण गेल्या काही महिन्यांपासून ते विकोपाला गेले होते. मोहम्मद हा सतत नुरजहाँ हीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी भांडण करत होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि मोहम्मद चौधरीने गळा दाबून नुरजहाँचा खून केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.