पतीने पत्नीवर चाकूने वार करुन केली आत्महत्या ; साेरतापवाडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 10:04 PM2019-06-02T22:04:18+5:302019-06-02T22:06:42+5:30
पतीने पत्नीवर चाकूने वार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोरतापवाडी येथी घटली आहे.
लोणी काळभोर : धाकट्या मेहुण्याचे लग्न झालेनंतर जावयाने दुस-याच दिवशी सासुरवाडीत स्वतःच्या पत्नीवर चाकूने खुनी हल्ला करुन विहरीत उडी मारुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोरतापवाडी ता. हवेली येथील खटाटेवस्तीत रविवारी पहाटे घडला आहे. सदर प्रकारचे कारण अस्पष्ट आहे.
सुभाष संपत झेंडे ( वय ४५, रा. दिवे ता. पुरंदर ) असे आत्महत्या केलेल्या जावायाचे नाव आहे. त्यांनी केलेल्या हल्ल्यात पत्नी, वैशाली ( वय ३५ ) ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर लोणी स्टेशन येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालु आहेत. झेंडे यांच्या सासुबाई रत्नाबाई बाळु चौधरी ( वय ६०, सोरतापवाडी, खटाटे वस्ती, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी सुभाष झेंडे यांच्या पत्नीवर हल्ला केल्याचा व स्वत: आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष झेंडे हे पुणे महानगरपालिकेच्या परीवहन खात्यात चालक म्हणून काम करत होते. झेंडे याच्या धाकटे मेहुने, अमर बाळु चौधरी यांच्या विवाहासाठी सुभाष झेंडे व पत्नी वैशालीसह तीन दिवसापुर्वी सोरतापवाडी येथे आले होते. शुक्रवारी ( ३१ मे ) अमरचा विवाह संपन्न झाला. नव वधूवरांसह सर्वजण सोरतापवाडी येथे आले. सुभाष झेंडे यांना मद्यपान व जुगाराचे व्यसन होते. यावरून वैशाली व सुभाष यांच्यात सतत कुरबुर होत असे.
शनिवार ( १ मे ) रोजी दुपारी झेंडे सासुरवाडीतुनच कामावर गेले होते. रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सासरचे लोक जेवून झोपी गेले. आज रविवार पहाटे २ वाजण्याच्या सुमारास, झेंडे घरी आले त्यावेळी त्यांची पत्नी वैशाली हिने दरवाजा उघडला. त्यावेळी त्याने अचानक तिचे डावे हाताला धरून बाहेर ओढले व तिला काही कळायच्या आत चाकूने तिचे छातीवर डाव्या बाजूस वार केला. तिने त्याला ढकलून दिले. यानंतर त्याने तिचे उजवा हात, हनुवटी व नाकावर वार केले. यामुळे ती जोरात ओरडली व बेशुद्ध होऊन खाली पडली.
वैशालीच्या आवाजाने तिची आई व दोन भाऊ यांना जाग आली. ते सर्वजण आपल्याकडे येत आहेत हे पाहून सुभाष याने वैशालीला रक्ताच्या थारोळ्यात सोडुन घरालगत असलेल्या विहरीत उडी मारली. ही गाेष्ट लक्षात येताच वैशालीचे दोन्ही भाऊ अमर व अमोल यांनी विहरीत उतरुन शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र विहरीत मोठ्या प्रमाणात पाणी व अंधार असल्याने झेंडे यांना वाचवण्यात दोघांनाही अपयश आले. वैशालीला उपचारासाठी लोणी स्टेशन येथील विश्वराज रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही बाब लोणी काळभोर पोलिसांना समजताच, पोलिसांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने रविवारी सकाळी आठ वाजनेच्या सुमारास विहरीत उतरुन सुभाष झेंडे यांचा मृतदेह बाहेर काढला. व उत्तरीय तपासणी साठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवला.