चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करणाऱ्या पतीस आजन्म कारावास आणि ५ हजार रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:22 PM2021-02-25T12:22:09+5:302021-02-25T12:26:45+5:30
ही घटना वारजे येथील राहत्या घरी ३० जानेवारी २०१५ मध्ये घडली होती.
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी. पी. अ्ग्रवाल यांनी मयेपर्यंत जन्मठेप (आजन्म कारावास) आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
राजू दुसाणे (रा. आकाशनगर, वारजे) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. ही घटना वारजे येथील राहत्या घरी ३० जानेवारी २०१५ मध्ये घडली होती. राजू याने आपली पत्नी सविता हिच्यावर कुऱ्हाडीने वार करुन तिचा खून केला होता.याप्रकरणी विनाेद दाभाडे (रा. वारजे जकात नाक्याजवळ) यांनी फिर्याद दिली होती. दुसाणे दामप्पत्याला २ मुली व एक मुलगा आहे. या घटनेपूर्वी एक महिना आधी सविता हिला एक फोन आला होता. हे राजू याने पाहिले होते. तेव्हापासून तो सविताच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. एकदा त्याने सविता हिच्या साडीचा पदरही पेटवून दिला होता. तिच्या मुलीने ही आग विझविली होती. चारित्र्याच्या संशयावरुन घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी राजू याने सवितावर कु-हाडीने वार करुन तिचा खून केला. त्यानंतर तो रक्ताने भरलेल्या कपड्यांसह वारजे पोलीस ठाण्यात हजर झाला.तेथील पोलिसांना मी पत्नीचा खुन केल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन घरी गेले. तेव्हा सविता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या मानेवर व डोक्यावर वार करण्यात आले होते.
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील मोरे यांनी ९ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायालयाने राजू दुसाणे याला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली.
........
हा खटला परिस्थिती जन्य पुराव्यावर आधारीत होता. तसेच आरोपींचे कपडे आणि कुऱ्हाड जप्त करण्यात आली होती. वैद्यकीय अहवाल व इतर बाबींवर गुन्हा
सिद्ध करता आला.
ॲड. सुनील मोरे, सरकारी वकील