नवरा-बायकोचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 11:52 AM2022-11-01T11:52:15+5:302022-11-01T11:52:30+5:30

पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संबंधित नवरा बायको विरोधात गुन्हा दाखल

Husband-Wife Arrogance at Police Station Beating the police who intervened | नवरा-बायकोचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण

नवरा-बायकोचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण

Next

किरण शिंदे 

पुणे : रस्त्यावर भांडण करणाऱ्या दांपत्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणीही गोंधळ घातला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. संबंधित नवरा बायकोवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नवऱ्याला अटक करण्यात आली. 

सुनील दनाने आणि नीता सुनील दनाने (रा. कळस, विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नवरा बायकोची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अस्मिता सचिन लावंड यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर भांडण करत असल्यामुळे सुनील दनाने आणि अजय रिठे या दोघांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची विचारपूस केली जात होती. यावेळी आरोपी निता दनाने यांनी त्या ठिकाणी येऊन पोलीस अंमलदार कक्षातून अजय रिठे यांना ओढून घेऊन जाऊ लागल्या. यावेळी पोलीस शिपाई खेडकर यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता नीता दनाने हिने त्यांना हाताने मारहाण केली. तर आरोपी सुनील दनाने याने शिवीगाळ केली. 

आरोपी सुनील दनाने याने पोलीस उपनिरीक्षक मगदूम यांच्या हाताचा अंगठा पिरगाळला आणि पोलीस ठाण्यातील खिडकीच्या काचेवर डोके आपटायला सुरुवात केली. त्यानंतर काचेचा तुकडा हातात घेऊन तो खाली पळ सुटला होता. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संबंधित नवरा बायको विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील दनाने याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम अधिक तपास करत आहेत.

Web Title: Husband-Wife Arrogance at Police Station Beating the police who intervened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.