पत्नीला घरात पुरणाऱ्या पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 02:01 AM2018-10-27T02:01:29+5:302018-10-27T02:01:31+5:30
पत्नीचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह पडक्या घरात पुरणाºया पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बारामती : पत्नीचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह पडक्या घरात पुरणाºया पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथे ९ एप्रिल २०१४ रोजी ही घटना घडली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. राजकारणे यांनी ही शिक्षा सुनावली.
सुधीर शामराव सर्जेराव (वय ५७, रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी संगीता हिचा खून केला होता. याप्रकरणी तिचा भाऊ संतोष गवळी यांनी फिर्याद दिली होती. आरोपी सुधीर पत्नी संगीता हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून त्यांच्यामध्ये अनेकदा भांडणे होत असत. याच काळात त्याने त्याच्या मालकीची तीन एकर शेती विकली होती. या वादामुळे पत्नी मुलगा सागर याला घेऊन विभक्त राहू लागली होती. दरम्यान, ९ एप्रिल २०१४ रोजी सागरने आई हरवल्याची तक्रार इंदापूर पोलिसांकडे दिली. त्यानंतर आठ दिवसांनी आरोपीच्या घरालगत असलेल्या पडक्या घरामधून दुर्गंधी येऊ लागली होती. फिर्यादी गवळी व सागर या दोघांनी पाहणी केली असता तेथे जमीन उकरलेली दिसली. तेथे उकरल्यावर संगीताच्या अंगावरील साडी दिसली. ही साडी या दोघांनी ओळखली. त्याअनुषंगाने केलेल्या तपासात आरोपीने त्याची पत्नी संगीता हिचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह शेजारील घरामध्ये पुरल्याचे निष्पन्न झाले होते.
सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी तपास केला. खटल्याची सुनावणी न्यायाधीश राजकारणे यांच्यासमोर चालली. यामध्ये विशेष सरकारी वकील अॅड. प्रसन्न जोशी यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. यामध्ये तत्कालीन तहसीलदार, वैद्यकीय अधिकाºयांसह १४ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, तसेच प्रेत उत्खनन करणारे तहसीलदार यांचा समावेश होता. या खटल्यामध्ये आरोपीचा मुलगा व मुलीने आरोपीच्याविरोधात न्यायालयात जबाब दिला. सर्व पुरावा आरोपीच्याविरोधात सिद्ध झाल्याने आरोपीला जन्मठेप व आणखी ७ वर्षे शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षास हवालदार सोमनाथ कर्चे यांनी सहाय्य केले.