पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
By admin | Published: November 19, 2014 04:24 AM2014-11-19T04:24:05+5:302014-11-19T04:24:05+5:30
कर्जबाजारीपणाला कंटाळून ५६ वर्षीय पत्नीचा गळा दाबून खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोथरूडमधील भुसारी कॉलनीत मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
पुणे : कर्जबाजारीपणाला कंटाळून ५६ वर्षीय पत्नीचा गळा दाबून खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोथरूडमधील भुसारी कॉलनीत मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
हेमंत मधुसूदन ताम्हणकर (वय ५८) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. साधना हेमंत ताम्हणकर (वय ५६, रा. दोघेही फ्लॅट नं. १३, बांदल क्लासिक, भुसारी कॉलनी) यांचा त्याने खून केला. नैराश्यातून हेमंत यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने कोथरूड परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेमंत हे त्यांची पत्नी साधना व मुलगा केतन (वय ३३) यांच्यासह बांदल क्लासिक येथे भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन राहत होते. त्यांनी २००२ मध्ये इको बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांनी व मुलगा केतन या दोघांनी मिळून टिळक रस्ता व डहाणूकर कॉलनी येथे जिमचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय तोट्यात गेल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसून दीड कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. घरातील फ्रिज सोडून सगळ्या वस्तू त्यांनी विकून टाकल्या होत्या. दरम्यानच्या काळात साधना यांना २००७ मध्ये पॅरालिसीस झटका येऊन त्या अंथरुणाला खिळून राहिल्या. मंगळवारी सकाळी त्यांचा मुलगा केतन घराबाहेर पडला, त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास तो घरी परतला. त्या वेळी हेमंत यांनी गळफास घेतल्याचे त्याला आढळून आले. साधना या बेडवर निपचित पडल्या होत्या. केतनने कोथरूड पोलिसांना फोन करून माहिती दिली. (प्रतिनिधी)