नवरोबाला वंशाचा दिवा हवा; मात्र त्याला सांभाळणारी आई नको
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 02:09 PM2019-11-19T14:09:47+5:302019-11-19T14:10:14+5:30
स्वत:चे अपयश पत्नीवर फोडून पतीचा जाच
युगंधर ताजणे -
पुणे : मुलगी शिकली प्रगती झाली असे आपण अभिमानाने म्हणत असलो तरी मुलगा शिकला व प्रगती झाल्याचे म्हणताना अनेक गोष्टींची पडताळणी करावी लागते. एका नवरोबाला व्यवसायात आलेले अपयशाचे खापर बायकोवर फोडले. तिला माहेरून पैसे आणण्याची बळजबरी केली. त्यात मात्र दोन महिन्याच्या मुलाची होरपळ होऊ लागली. त्याला आईच्या दुधापासून तोडणाऱ्या नवऱ्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फटकारले असून त्या मुलाचा ताबा आईकडेच देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळेआईपासून दुरावलेल्या त्या बाळाला पुन्हा आईच्या मायेची ऊब मिळणार आहे.
रोहिणीचा साधारणपणे एक वर्षांपूर्वी सुधीरशी विवाह झाला. त्यांचा कौटुंबिक संमतीविवाह होता. (दोघांची नावे बदलली आहेत.) सुरुवातीचे काही महिने व्यवस्थित गेल्यानंतर सुधीर रोहिणीला त्रास देऊ लागला. वास्तविक त्याने सुरू केलेल्या व्यवसायाला फारसे यश न मिळाल्याने तो त्याचा राग रोहिणीवर काढत असे.
धंद्यात आलेला तोटा, त्यामुळे डोक्यावरील कर्जामुळे खचत चालला होता. त्या दोघांना जवळ आणणारा आणि त्यांच्यात संवादाचा पूल तयार करणारा धागा म्हणजे त्यांना दोन महिन्यांपूर्वी झालेले अपत्य होते. त्याच्या येण्याने काही दिवस का होईना दोघांमधला तणाव निवळला होता. परंतु धंद्यातील तोटा भरून काढण्याकरिता रोहिणीने माहेरून पैसे आणावेत, असा तगादा सुधीरने सुरूच ठेवला होता. यासाठी तो तिला शारीरिक व मानसिक त्रास देत असे. शेवटी त्याने तिला माहेरी पाठविण्याचा निर्णय घेतला. सुधीरच्या बहिणीने तिची
बॅग घेतली.
स्टॅण्डवर पोहोचताच रोहिणीला गाडीत बसण्यास सांगून तिच्या हातात बॅग देत मुलगा आपल्याकडे घेतला. यानंतर तिला गावाकडे पाठवून दिले. रोहिणीने गावाला पोलिसांकडे याबाबत फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता तिला त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. माहेरून थोडेफार पैसे घेऊन तिने पुण्यात आल्यावर पोलिसांना आपली हकीकत सांगितली. यावर त्यांनी कोर्टाकडून मुलाचा ताबा घेण्याविषयी तिला सुचवले.
.....
समाजात अद्याप मुलीविषयीची मानसिकता संकुचित असल्याचे दिसून येते. या दाव्यात पतीने आपल्याला मुलगा आहे यामुळे त्याचा ताबा स्वत:कडे ठेवून आईला माहेरून पैसे आणण्याकरिता प्रवृत्त केले. तिने त्यास नकार दिल्यानंतर त्रास देण्यास सुरुवात केली. मुलाऐवजी मुलगी असती तर त्याने पत्नीला व मुलीला दोघांनादेखील घराबाहेर काढले असते. मुलाला सांभाळणे, त्याची काळजी घेणे, त्याला दुग्धपान करणे यासारख्या गोष्टी लक्षात घेऊन न्यायालयाने आईला त्या मुलाचा ताबा दिला. मुलगा-मुलगी असा भेद अद्याप समाजाच्या मानसिकतेतून दूर झालेला नाही. हुंड्याच्या, छळाच्या, शारीरिक व मानसिक त्रासाच्या तक्रारी सुरूच असून त्या माध्यमातून निर्घृणपणे महिलेवर अत्याचार करणे हे कशाचे द्योतक आहे? असा प्रश्न या प्रकारच्या खटल्यातून उपस्थित होतो. - अॅड. सुजाता तांबे, जिल्हा न्यायालय
.....
1 - रोहिणीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांना परिस्थितीची कल्पना दिली. बाळाशिवाय आपण जगू शकत नाही. मला माझे बाळ परत हवे आहे, अशी याचना त्यांच्याकडे केली. भागवत यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाची जबाबदारी अॅड. सुजाता तांबे यांच्याकडे सोपविली. त्यांनी रोहिणीची बाजू कोर्टात मांडत मुलाचा ताबा त्यांना पुन्हा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १२ नोव्हेंबर रोजी दावा दाखल करून १५ नोव्हेंबर रोजी त्यांनी आईपासून दुरावलेल्या बाळाला आईच्या स्वाधीन केले.
2 अवघ्या दोन महिन्यांचे बाळ सुखरुप राहण्याकरिता त्याला आईच्या सहवासाची नितांत गरज आहे. आईशिवाय ते राहू शकणार नाही. हुंड्याच्या नावाखाली महिलांचा शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे प्रकार अद्याप सुरु आहेत. त्यातही मुलगा झाल्यानंतर ताबा स्वत:कडे ठेवणे व मुलगी झाल्यास आईकडे अशा प्रकारची मानसिकता चुकीची आहे, असा युक्तिवाद अॅड. तांंबे यांनी केला.