झोपड्या हटविल्या

By Admin | Published: November 17, 2016 04:22 AM2016-11-17T04:22:15+5:302016-11-17T04:22:15+5:30

फर्ग्युसन रस्त्यावरील पाटील बंगला परिसरातील काही घरे झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरण (एसआरए) यांच्या वतीने बुधवारी सकाळी पाडण्यात आली.

Hut removed | झोपड्या हटविल्या

झोपड्या हटविल्या

googlenewsNext

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील पाटील बंगला परिसरातील काही घरे झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरण (एसआरए) यांच्या वतीने बुधवारी सकाळी पाडण्यात आली. या भागातील झोपड्या हलवून तिथे नवी इमारत बांधण्याचा प्रकल्प मंजूर झाला असून, त्याला काही झोपडीधारकांचा विरोध असल्यामुळे ३ पेक्षा जास्त वर्षे हा प्रकल्प रेंगाळला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून ही कारवाई करण्यात आली.
एसआरएचे वरिष्ठ अधिकारी सुरेश जाधव यांनी सांगितले, की या भागातील झोपड्या हलवून तिथे नवी इमारत करायची व तिथे झोपडीधारकांना घरे द्यायची, इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत सर्व पात्र झोपडीधारकांच्या निवासाची व्यवस्था दुसरीकडे करायची, असा प्रकल्प सन २०१० मध्ये मंजूर झाला आहे. त्यानंतर पात्र झोपडीधारकांची यादी तयार करण्यात आली. सन २०११ मध्ये झोपडी निर्मूलन आदेशही जारी करण्यात आला. मात्र, त्या वेळी एकूण १२९ पात्र झोपडीधारकांपैकी ४१ जणांनी या आदेशाला हरकत घेतली.
एकाच कुटुंबातील काही सदस्य वाढले असल्याने त्यांना वेगळी जागा हवी होती. त्यांची वेगळी झोपडी आहे, असे संबधितांकडून सांगण्यात येत होते. यावादात जी पात्र कुटुंबे होती त्यांच्यापैकी ९७ जणांना तात्पुरती व्यवस्था केलेल्या जागेत हलविण्यातही आले. मात्र, उर्वरित ४१ जणांनी झोपडी निर्मूलन आदेशाला न्यायालयात आव्हान दिले. कनिष्ठ न्यायालयात त्यांच्या विरोधात निकाल लागला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपिल केले. त्याचाही निकाल लागला असून, त्यात कोठेही निर्मूलन आदेशाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे जाधव यांनी सांगितले.
घरे पाडून टाकलेल्या सर्व झोपडीधारकांना तात्पुरती व्यवस्था म्हणून केलेली घरे तीन वर्षांपूर्वीच देण्यात आली आहेत. तिथे ते राहू शकतील. इमारतीचे काम त्वरित सुरू करण्याबाबत विकसकाला कळविण्यात आले आहे असे
जाधव म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Hut removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.